
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानी खेळाडू जपानच्या दिशेने रवाना होत असतानाच निवास व्यवस्थेचा मोठा घोळ समोर आला आहे. हिंदुस्थानी पथकासाठी क्रूझ शिपवर तब्बल 40 खोल्या कमी देण्यात आल्याने सुमारे 80 खेळाडूंच्या मुक्कामाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका खोलीत दोन खेळाडूंची व्यवस्था करण्यात येणार असल्याने खोल्या कमी पडल्याचा फटका थेट खेळाडूंना बसणार आहे.
हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) सोमवारी या गंभीर प्रकाराची दखल घेत आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या (ओसीए) आणि स्पर्धेच्या आयोजन समितीसमोर हा मुद्दा उपस्थित केला. हिंदुस्थानी खेळाडूंना नागोया येथे पोहोचल्यानंतर निवासासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी आयओएच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी केली आहे.
खोल्या कमी असल्याचा धक्कादायक खुलासा
हिंदुस्थानी पथकाचे शेफ-डी-मिशन सहदेव यादव सोमवारी नागोया येथे पोहोचले. त्यांनी हिंदुस्थानी खेळाडूंच्या निवास व्यवस्थेचा आढावा घेतला असता क्रूझ शिपवर गरजेपेक्षा कमी खोल्या आरक्षित असल्याचे उघड झाले. त्यांनी तातडीने ही बाब ‘आयओए’च्या निदर्शनास आणून दिली. ‘आयओए’नेही आयोजन समितीशी चर्चा करून तातडीने तोडगा काढण्यास सांगितले आहे. खोल्या उपलब्ध नसतील तर हॉटेल किंवा अन्य ठिकाणी अतिरिक्त निवासाची व्यवस्था करावी, अशी स्पष्ट भूमिका पी. टी. उषा यांनी घेतली आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या आशियाई क्रीडा स्पर्धेत जवळपास 500 हिंदुस्थानी खेळाडू सहभागी होणार आहेत. खेळाडूंची राहण्याची व्यवस्था पंटेनर, क्रूझ शिप आणि हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
निवास व्यवस्थेचा घोळ सुरू असतानाच हिंदुस्थानी अॅथलिट्स पथकालाही व्हिसाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आठ हिंदुस्थानी अॅथलिट्सना अद्याप जपानचा व्हिसा मिळालेला नसल्याने ते स्पर्धेसाठी रवाना होऊ शकलेले नाहीत. यात हातोडा फेकपटू प्रवीण कुमार, 100 मीटरचा धावपटू हरिता भद्रा, 400 मीटरचा धावपटू किरण पाहल, तिहेरी उडीपटू आशा इलांगो, बांबू उडीपटू सिंधू श्री, थाळीफेकमधील सान्या यादव यांच्यासह हेप्टॅथलॉनपटू अनामिका आणि उंच उडीतील सुप्रिया यांचा समावेश आहे. दरम्यान, अविनाश साबळे, पारुल चौधरी आणि प्रियंका गोस्वामी यांनाही अद्याप जपान गाठता आलेले नाही.



























































