एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा निवड करण्यात आली आहे. टाटा समूहाच्या सर्व बोर्ड सदस्यांनी चंद्रशेखरन यांच्या बाजूने मतदान करत त्यांना पुढील पाच वर्षे या पदावर कायम ठेवण्यास मंजुरी दिली आहे. मात्र या निर्णयाला टाटा ट्रट्सचे चेअरमन नोएल टाटा यांनी विरोध दर्शवला असून त्यांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले, असे वृत्त आज तकने दिले आहे.

बोर्डाच्या मंजुरीमुळे चंद्रशेखरन आता आगामी पाच वर्षे या महत्त्वाच्या पदाची धुरा सांभाळत राहतील. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात त्यांनी नेतृत्वाबाबत स्पष्टता नसण्याचे कारण देत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, याशिवाय बोर्डाने टाटा सन्सला पब्लिक (लिस्टेड) करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्ट्सची जवळपास ६६ टक्के मालकी आहे आणि समूहावर ट्रट्सचा मोठा प्रभाव आहे. नोएल टाटा यांनी टाटा सन्स शेअर बाजारात लिस्ट होऊ नये, अशी भूमिका घेतली होती. तसेच समूहाच्या कर्जाच्या स्थितीबद्दलही चिंता व्यक्त केली होती, ज्यावरून समूहात अंतर्गत घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. अखेर बोर्डाच्या बहुमताच्या जोरावर एन. चंद्रशेखरन यांच्या पुढील ५ वर्षांच्या कालावधीवर शिक्कामोर्तब झाले आहे.