
>> प्रांजल वाघ, [email protected]
एखादं भीमथडीचं वारू दख्खनी वारा पिऊन बेभान सुटावं तशी आमची KSRTCची लाडकी ‘सरिग’ बस, गदगच्या तापलेल्या डांबरी सडकेवरून सुसाट निघालेली. याच प्रवासात गजेंद्रगडवरून रोण या गावात जाणाऱ्या रस्त्यावर अवघ्या 12 किमीवर एक अगदी छोटंसं गाव सापडलं. मंदिरांनी, मूर्तींनी आणि बारवांनी नटलेल्या या गावाचं नाव होतं – सुडी!
बस थांबताच पटापट बॅगा घेऊन खाली उड्या टाकल्या आणि जवळच असलेल्या एका बंदिस्त आवाराकडे धूम ठोकली! फाटकातून आत जाताच काही वास्तू नजरेस पडल्या. त्यांची स्थापत्यशैली त्यांची प्राचीनता दर्शवत होती.
तिथून चार पावलं पुढे गेलो तर एक छोटेखानी मंदिर आढळलं आणि त्याबाहेर होत्या दोन अर्धवट भग्न मूर्ती. ते गणेश मंदिर होते पण अगदी साधे आणि त्यावर कोरीव कामाचा अभाव पाहून या मूर्तींबद्दल कुतूहल निर्माण झाले. आम्ही आपापसात तर्क-कुतर्क करू लागलो. मंदिरांचं थोडंफार ज्ञान असल्याने तिथे पडलेल्या त्या मूर्ती या द्वारपालांच्या होत्या हे एव्हाना कळले होते. संपूर्ण दगडी असलेल्या मंदिरात प्रवेश करताच बाहेरची उन्हाची आग एकदम गायब झाली. आतील मनमोहक थंडाव्याने क्षणात अराम दिला. मंदिराच्या आत एकाच दगडापासून घडवलेली सहा फुटी, एकसंध आणि पोटावर नाग बांधलेली लंबोदर मूर्ती होती! संपूर्ण मंदिरच या मूर्तीने भरून गेले होते!
गणपती मंदिरावरूनच काही अंतरावर लागते ती कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना असलेली एक ‘बावी’ (बारव). तिचे नाव नागकुंड! छोटीशी, सुबक आणि चालुक्य शैलीतील एखाद्या मंदिरासारखी कोरलेली, भिंतींवर द्राविडी विमानांचे साज लेवुनी दिमाखात उभी असलेली ही बारव.
सुडीमधील मंदिरांचे निर्माते कल्याणी चालुक्य होते. आजच्या बसवकल्याण येथे राजधानी असलेलं हे साम्राज्य कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बहुतांश महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणारे हे चालुक्य साम्राज्य. यामुळेच सुडी गावाला त्या काळी अनन्यसाधारण महत्त्व होते. या प्रांताच्या अंतर्गत 70 गावं होती आणि या प्रांताचे मुख्य शहर म्हणून सुडी/सुंडी गावाला ‘राजधानी सुंडी’ संबोधले जायचे.
सम्राट आणि साम्राज्ये उदयास आली अन् लयास गेली, विध्वंसक परधर्मीय आक्रमणे आली आणि गेली, पण आजही सुडीमधील स्थापत्य टिकून आहे. जणू काळाप्रमाणेच या वास्तूदेखील शाश्वत आणि चिरंतन आहेत!






























































