वेधक – डोंबिवलीच्या अदितीची अवकाश भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग पोतदार

जिद्द, कुतूहल आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर अवकाश विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत अदिती प्रवीण सकपाळ हिने तब्बल 16 लघुग्रहांचा शोध लावून आपल्या प्रतिभेची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जिद्द, चिकाटी आणि अविरत अभ्यासाच्या जोरावर डोंबिवलीतील 17 वर्षीय विद्यार्थिनी अदिती प्रवीण सकपाळ हिने अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स. वा. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिक्षण घेणाऱ्या अदितीने तब्बल 16 लघुग्रहांचा शोध लावला असून, तिच्या संशोधनाची दखल अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने घेतली आहे. तिच्या शोधातील `2024 WA95’, ‘2024 WQ39’ आणि `2024 FO7′ या तीन संभाव्य लघुग्रहांची नोंद नासाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अदितीला इयत्ता आठवीपासूनच अंतराळ संशोधनाची आवड निर्माण झाली. रात्रीच्या आकाशातील तारे आणि अवकाशातील घडामोडींचा अभ्यास करण्याची तिची जिज्ञासा पुढे संशोधनाच्या दिशेने वळली. टिळकनगर विद्यामंदिरची माजी विद्यार्थिनी असलेल्या अदितीने कमी वयात मिळवलेले हे यश तिच्या संशोधक वृत्तीचे द्योतक मानले जात आहे.

पुण्यातील ‘स्पेसक्रॅट्स विद्यापीठा’मार्फत देशभरातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांमधून निवड प्रक्रिया राबवण्यात आली. चाचण्या आणि सुमारे दहा हजार मुलाखतींच्या खडतर प्रक्रियेनंतर अदितीची ठाणे जिह्याची ‘स्पेसक्रॅट्स अॅम्बेसेडर’ म्हणून निवड झाली. तिच्यासोबत बदलापूरच्या सोहम साळवे याचीही निवड करण्यात आली आहे. सोहम हा वयाच्या नवव्या वर्षापासून अंतराळ संशोधनाचे धडे गिरवत असून सध्या तो आंतरराष्ट्रीय सायंटिस्ट प्रोग्राममध्ये कार्यरत आहे
या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे जिह्यातील शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य अंतराळ संशोधन प्रशिक्षण पोहोचवण्यात येणार आहे. असा उपक्रम राबवणारा ठाणे हा देशातील पहिला जिल्हा ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

अदितीला डॉ. युवराज लांबोळे आणि स्पेस सायंटिस्ट प्रवीण वाकोडे यांचे मार्गदर्शन लाभले. ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांना मोफत अंतराळ प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही अदिती पार पाडत आहे. त्यामुळे स्वत संशोधन करण्यासोबतच इतर विद्यार्थ्यांमध्येही अवकाश विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचे काम ती करत आहे. इयत्ता आठवीपासूनच रात्रीच्या आकाशातील ताऱयांचे वेध घेणाऱया अदितीची ही संशोधक वृत्ती आज फळाला आल्याची भावना तिचे वडील प्रवीण सकपाळ यांनी अभिमानाने व्यक्त केली असून, तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल डोंबिवली आणि ठाणे जिह्यातून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अदितीची ही कामगिरी केवळ तिच्या वैयक्तिक यशाची कहाणी नाही, तर विज्ञानाची आवड, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास भारतीय विद्यार्थी जागतिक पातळीवरही ठसा उमटवू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.