आरोग्य – विस्मरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
[email protected]

वयाच्या एका टप्प्यावर विस्मरणाला सामोरे जावे लागते. मात्र आरोग्यदायी शैली अंगिकारल्यास याची शक्यता कमी होते.

आजच्या तंत्रज्ञान युगात विस्मरण हे फक्त वृद्धांमध्ये नव्हे, तर तरुणांनाही भेडसावणारी समस्या बनला आहे. नावे विसरणे, वस्तू कुठे ठेवली ते न आठवणे, कामाची वेळ चुकवणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे किंवा मानसिकदृष्ट्या मंद वाटणे अशी चिंता वाटणारी लक्षणे दिसू लागली आहेत. ही लक्षणे विशेषत 20 -30 वर्षांच्या तरुणांमध्ये दिसू लागली आहेत. स्मृती कमी होणे नेहमीच गंभीर नसते, परंतु ते कधीही दुर्लक्षित केले जाऊ नये. लवकर निदान झाल्यास पुढे होणार त्रास टाळता येईल.
स्मरणशक्ती कमी होणे म्हणजे माहिती लक्षात ठेवण्यात, नवीन गोष्टी शिकण्यात किंवा भूतकाळातील घटना आठवण्यात अडचण येणे. याचा परिणाम अल्पकालीन स्मृती, दीर्घकालीन स्मृती किंवा दोन्हीवर होऊ शकतो. विसराळूपण, मेंदू स्तब्ध होणे, कामावर किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यात अडचण या स्वरूपात दिसू शकतात.

कधी कधी विसरणे सामान्य आहे. तथापि, सतत विसराळूपण एखाद्या शरीरांतर्गत आजाराचे किंवा मानसिक आरोग्य स्थितीचे निदान असू शकते. ज्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नाहीतर त्याचा परिणाम स्मृतिभ्रंश होऊ शकतो.

नुकतीच झालेली संवाद, संभाषणे किंवा घटना विसरणे, लक्ष केंद्रित अडचण येणे, शब्द किंवा नावे आठवण्यात अडचण येणे, कामांच्या वेळा किंवा ठरवलेल्या भेटींचा वेळ विसरणे, मेंदू गोंधळलेला वाटणे, एकाच वेळी अनेक कामे करण्याची क्षमता ( मल्टीटास्किंग)कमी होणे इत्यादी लक्षणे दैनंदिन जीवनात व्यत्यय आणत असतील तर लवकरात लवकर उपचार करणे आवश्यक आहे.

सतत तणावाखाली राहिल्यास त्याचा परिणाम मेंदूच्या स्मृती साठवण्याच्या प्रक्रियेवर होतो. चिंतेमुळे मनावर ताण येतो, ज्यामुळे माहिती साठवणे आणि आठवणे अधिक कठीण होते. झोपेची गुणवत्ता कमी असेल तरी विस्मरण वाढू लागते. स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी झोप आवश्यक आहे. अनियमित झोप, निद्रानाश किंवा झोपेचे विकार मेंदूची कार्यक्षमता कमी करतात.

नैराश्य आणि मानसिक आरोग्य विकार हेसुद्धा स्मृती कमी करण्यास कारणीभूत ठरतात. अनेकदा स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होतो. नैराश्यग्रस्त अनेक व्यक्तींना मनस्थितीची लक्षणे स्पष्टपणे दिसण्यापूर्वीच स्मरणशक्ती कमी झाल्याचे जाणवते. स्मरणशक्ती आणि मेंदूचे आरोग्य पूर्ववत करण्यासाठी मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मेंदूला व्यवस्थित कार्य करण्यासाठी योग्य पोषणाची गरज असते. व्हिटॅमिन बी12, विटामिन डी , लोह आणि फोलेट यांच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती कमी होणे, थकवा आणि गोंधळ होऊ शकतो. यासाठी संतुलित, पोषकतत्त्वांनी समृद्ध आहार घ्या.

मोबाईल आणि सोशल मीडिया याचा अतिवापर हे एक प्रमुख कारण विसराळूपण वाढवण्यास कारणीभूत ठरते आहे.

तसेच अल्कोहोल म्हणजे मद्य आणि अमली पदार्थ मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचवू शकतात आणि स्मृती निर्मितीमध्ये अडथळा आणू शकतात. अगदी माफक प्रमाणात, पण वारंवार केलेल्या सेवनामुळेही तरुण आणि प्रौढांमध्ये स्मरणशक्तीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. हार्मोनल बदल किंवा थायरॉईडच्या समस्यांसारखे विकार स्मृती आणि संज्ञानात्मक कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात.

डोक्याला दुखापत, अगदी सौम्य दुखापतींमुळेही दीर्घकालीन स्मृती समस्या उद्भवू शकतात. लक्षणे आठवडे किंवा महिन्यांनंतर दिसू शकतात.

एपिलेप्सी, संसर्ग, ऑटोइम्यून डिसऑर्डर आणि मेंदूचे रोग यासारख्या काही परिस्थिती स्मृतीवर परिणाम करू शकतात. जरी दुर्मिळ असले तरी चांगल्या परिणामांसाठी त्यांचे लवकर निदान आवश्यक आहे.

विसराळूपणाचा कामावर, अभ्यासावर किंवा नातेसंबंधांवर परिणाम होत असेल . सतत मूड बदल, मनात गोंधळ होत असेल तर ते गंभीर आहे. याकरिता मानसोपचार तज्ञाकडून ताण, चिंता, नैराश्य आणि मानसिक आरोग्य स्थितींवर उपचार करणे, जीवनसत्त्वे आणि पौष्टिक आहार, नियमित आणि मेंदूच्या आरोग्य चांगले राहण्यासाठी जीवनशैलीत बदल, न्यूरोलॉजिकल किंवा हार्मोनल स्थितींसाठी वैद्यकीय सल्ला घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

नियमित चांगली झोप घ्या – नियमित व्यायाम आणि योगासने करून शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा. क्रीन, मोबाईलचा वापर कमी करा. मेंदूला चालना देणाऱया उपक्रमात सहभागी व्हा. उदा- सुडोकू, शब्द कोडी सोडवणे, एखादे नवीन स्तोत्र, कविता किंवा गाणे पाठ करणे.

असे उपक्रम सुरू ठेवा. एकटेपण टाळा, मित्रपरिवार आणि कुटुंबीय यांच्या सोबत संपर्क ठेवा. महत्त्वाचे म्हणजे वेळ निघून जाण्याआधी विस्मरणासारखी कुठलीही लक्षणे वारंवार दिसल्यास ताबडतोब तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तरच पुढे होणारे दुष्परिणाम टाळता येतील.