शैलगृहांच्या विश्वात – शैलगृहांचे विशाल विश्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मंजिरी भालेराव
[email protected]

भारतातील शैलगृहे ही केवळ दगड-धोंड्यांची रचना नसून ती प्राचीन भारताची समृद्ध संस्कृती, कला आणि अध्यात्माची जिवंत गाथा आहे. या शैलगृहांनी शतकानुशतके नैसर्गिक आपत्ती आणि काळाचा प्रभाव सहन करत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. हा अमूल्य वारसा आपण जपला पाहिजे.

भारत हा प्राचीन कला, संस्कृती आणि स्थापत्यशास्त्राचा अद्भुत वारसा लाभलेला देश आहे. या वारशातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि थक्क करणारा भाग म्हणजे ‘शैलगृहे’. डोंगराचे प्रचंड खडक कोरून तयार केलेली ही मंदिरे, विहार आणि चैत्यगृह भारताच्या प्राचीन कारागिरीचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा सुस्पष्ट पुरावा आहेत. इसवी सन पूर्व तिसऱया शतकापासून ते इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकापर्यंत, म्हणजेच जवळपास 1,500 वर्षांच्या काळात भारतात शैलगृहांची निर्मिती झाली. मौर्य काळानंतर शैलगृह स्थापत्याचा सुवर्णकाळ पश्चिम भारतातील दख्खनच्या पठारावर, विशेषत आजच्या महाराष्ट्रात पाहता येतो. सातवाहन, त्रैकूटक, वाकाटक, चालुक्य, कलचुरी, राष्ट्रकूट आणि शिलाहार राजांच्या आश्रयाने शेकडो लेणी कोरल्या गेल्या.

भारतातील शैलगृहे ही प्रामुख्याने बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांशी संबंधित आहेत. ही शैलगृहे केवळ प्रार्थनेची ठिकाणे नव्हती, तर ते शिक्षणाचे केंद्र, साधकांचे निवासस्थान आणि व्यापारी मार्गावरील विश्रामगृहे होती. यापैकी काही स्थळांची माहिती आतापर्यंत आपण पहिली आहे. 1000 पेक्षा जास्त शैलगृहे भारतात तयार झाली आहेत. त्या सगळ्यांची ओळख करून घेणे केवळ अशक्य आहे. पण या शेवटच्या लेखात इतर काही महत्त्वाच्या शैलगृहांची ओळख अगदी थोडक्यात करून घ्यायला पाहिजे. बौद्ध शैलगृहांची माहिती पाहत असताना त्यांचा विकास कसा होत गेला हे तर आपण पाहिलेच. पण त्यातही काही वेगळ्या स्थळांची ओळख आपण करून घेतली. त्या परंपरेत अजून काही स्थळे आहेत ज्यांची माहिती ही घ्यायलाच हवी, ती म्हणजे कान्हेरी, वेरूळ आणि पन्हाळे काजी येथील शैलगृहे.

इ. स. पूर्व पहिल्या शतकात कोरायला सुरुवात करून, शंभरपेक्षा जास्त शैलगृहे आणि जवळ जवळ 1500 पेक्षा जास्त वर्षे भिक्षूंचे वास्तव्य असलेल्या मुंबईमधील बोरिवली येथील कान्हेरी लेणी म्हणजे बौद्ध धर्माच्या विकासातील विविध टप्पे उलगडून दाखवणारे दस्तावेजच आहे. डॉ. सूरज पंडित यांनी त्यांच्या सखोल अभ्यासानंतर या स्थळाची अनेक वैशिष्ट्ये उजेडात आणली. कान्हेरी येथील बौद्ध धर्माच्या संप्रदायानुसार केलेले शैलगृहसमूह आणि त्यांच्या रचना, तसेच त्यातील शिलालेख, मूर्ती, स्थापत्य, धार्मिक विधी, स्मारक स्तूपसमूह इ. सर्वांचा एकत्रित अभ्यास करून विविध कालखंडातील भिक्षू आणि उपासकांचे धार्मिक जीवन कसे होते यावर प्रकाश पाडला आहे. ‘एकादशमुख’ म्हणजे अकरा डोकी असलेल्या अवलोकितेश्वराचे जगातील पहिले शिल्प असलेल्या या शैलगृहसमूहाचे स्थानमाहात्म्य त्यांनी जगापुढे आणले.

साधारण याच काळात म्हणजे इ.स.चे 1 ले शतक ते इ.स.चे 12 वे शतक या काळात तयार झालेल्या कोकणातील कोटजाई नदीच्या काठावर असलेल्या पन्हाळे काजी येथील शैलगृहसमूह नदीच्या गाळाने भरला होता. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे महानिदेशक श्री. म. न. देशपांडे यांनी इथे मोठ्या प्रमाणावर जतन, संवर्धन आणि संशोधन केले. बौद्ध, शैव, गाणपत्य आणि नाथ संप्रदाय या सर्वांसाठी इथे लेणी तयार केलेली होती.

जगप्रसिद्ध वेरूळ येथे बौद्ध, हिंदू आणि जैन या तीनही धर्मपरंपरांसाठी एकाच ठिकाणी शैलगृहे तयार केली गेली. त्यामधील कैलास हे एकपाषाणी शिवमंदिर जगप्रसिद्ध आहे. बौद्ध धर्माच्या विकासातील तंत्रमार्गाचा टप्पाही अनेक देवतांच्या मूर्ती तसेच तटबंदीने बंदिस्त केलेल्या, वैयक्तिक साधनेसाठी निर्माण केलेल्या विहारांमधून लक्षात येतो. ज्या प्रकारचे राहण्यासाठी तयार केलेले विहार हे बहुसंख्य बौद्ध शैलगृहसमूहात दिसतात, तसे जैन आणि हिंदू समूहात आढळत नाहीत. तिथे फक्त प्रार्थनागृहच असतात. वेरूळमधील या तीनही धर्मियांच्या शैलगृहांची व्यवच्छेदक लक्षणे तिथे स्पष्टपणे आढळतात.

जगप्रसिद्ध शैलगृहसमूहांमध्ये जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरीचासुद्धा समावेश करायला हवा. मुळात एक अत्यंत गजबजलेले व्यापारी केंद्र असलेले हे बेट बौद्ध आणि हिंदू धर्मियांसाठी केलेल्या शैलगृहांसाठी प्रसिद्ध आहे. पण यामध्ये जास्त प्रसिद्ध आहे ते म्हणजे तथाकथित ‘त्रिमूर्ती‘ नावाने प्रसिद्ध असलेले आणि ‘सदाशिव’ या संकल्पनेची अभिव्यक्ती असलेले लेणे. पाशुपत संप्रदायाची दीक्षा घेतलेल्या साधकासाठी ‘परशिव’ हे तत्त्व समजून घेण्यासाठी जो आध्यात्मिक प्रवास करायचा असे त्यासाठी आवश्यक असलेल्या शिवाच्या मूर्त रूपातील लीलामूर्ती, ज्यामध्ये संहार आणि अनुग्रहमूर्ती आहेत, तसेच मूर्त-अमूर्त स्वरूपातील ‘सदाशिव’ ज्यामध्ये ‘तत्पुरुष’, ‘वामदेव’, ‘अघोर’, ‘सद्योजात आणि ‘ईशान‘ या शिवाचे पाचांपैकी तीनच मुखे दिसणारे भव्य शिल्प आणि अमूर्त रूपातील गाभाऱयातील शिवलिंग, या सर्वांचा आविष्कार पाहायला मिळतो. या लेण्यातील भव्य शिल्पांचे सौंदर्य, जरी त्यातील काही भंगली असली तरी, सहज लक्षात येते. इ.स.च्या 6 व्या शतकातील हे लेणे तत्कालीन पाशुपत गुरू, साधक, उत्कृष्ट कलाकार आणि या सर्वांना ज्याने आर्थिक पाठबळ दिले तो आश्रयदाता या सर्वांची कल्पना, स्वप्न पूर्ण करण्याची महत्त्वाकांक्षा आणि चिकाटी, तसेच कौशल्य या सर्वांचे उत्तम उदाहरण आहे. धर्म, तत्त्वज्ञान, कला आणि भक्ती या सर्वांचा एक अद्भुत मिलाफ या ठिकाणी पाहायला मिळतो.

भारतातील शैलगृहांच्या विश्वात अनेक जैन शैलगृहेसुद्धा आहेत. जैन धर्मातील तीर्थंकरांच्या, यक्ष-यक्षी यांच्या आणि देवतांच्या मूर्ती तसेच अत्यंत बारीक नक्षीकाम ही जैन शैलगृहांची ओळख आहे. वेरूळ येथील तथाकथित ‘इंद्रसभा’ आणि ‘जगन्नाथ सभा’ त्यांच्या सुरेख कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच चामरलेणे, मांगी तुंगी, मोहिदे इ. ठिकाणी भक्तांनी दिलेल्या दानामधून शैलगृहे तयार झाली आहेत.

प्राचीन काळी कोणतीही यंत्रे नसताना केवळ छिन्नी, हातोडा आणि ओळंबा यांच्या साहाय्याने कारागिरांनी हे विशाल विश्व निर्माण केले. डोंगराच्या माथ्यापासून कोरीव कामाला सुरुवात करून खाली येणे, प्रकाश आणि हवेची योग्य सोय ठेवणे, आवश्यक तिथे शिल्पकाम आणि चित्रकाम करणे तसेच पावसाचे पाणी साठवण्यासाठी खडकातच पाण्याच्या टाक्या तयार करणे, हे प्राचीन स्थापत्यविशारदांचे, कारागिरांचे आणि शिल्पकार तसेच चित्रकार यांचे कौशल्य थक्क करणारे आहे. भारतातील शैलगृहे ही केवळ दगड-धोंड्यांची रचना नसून ती प्राचीन भारताची समृद्ध संस्कृती, कला आणि अध्यात्माची जिवंत गाथा आहे. या शैलगृहांनी शतकानुशतके नैसर्गिक आपत्ती आणि काळाचा प्रभाव सहन करत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. युनेस्कोने अनेक शैलगृहांना ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले आहे. हा अमूल्य वारसा समजून घेणे, जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच आता विराम घेत आहे !
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)