
>> जयवंत जनार्दन मालणकर
बाप्पावरची निरलस श्रद्धा आणि कोकणातला साधेपणा आजही अढळ आहे. कोकणातल्या या गणपती उत्सवाचे दर्शन घडवणारा हा लेख.
उपजीविकेसाठी मी मुंबईसारख्या शहरात राहत असलो तरी सालाबादप्रमाणे घरगुती गणेशोत्सवासाठी कोकणात न चुकता जातोच. कोकणातील ग्रामीण भागातील गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून तो कोकणच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि एकत्र येण्याचा सर्वात मोठा उत्सव आहे. मुंबई – पुण्यासारख्या शहरांत सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठे रूप पाहायला मिळत असले तरी कोकणातल्या गावांमध्ये घरगुती गणपती आणि पारंपरिक रीतिरिवाजांना सर्वोच्च स्थान असते. वर्षानुवर्षे केवळ उपजीविकेसाठी मुंबई – पुण्यात राहणारे चाकरमानी या सणासाठी आवर्जून आपल्या मूळ गावी येतात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, कोकण रेल्वे आणि खासगी आराम गाड्यांनी चाकरमानी कुटुंबासहीत गावात दाखल होतात, ज्यामुळे वर्षभर शांत असलेली गावे चैतन्याने न्हाऊन निघतात.
कोकणात शहरांप्रमाणे गल्लोगल्ली सार्वजनिक मंडळे नसतात. येथे प्रत्येक घरामध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना होते. ग्रामीण भागात आजही बहुतांश ठिकाणी पर्यावरणपूर्वक शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. चतुर्थीच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी सकाळी गणेश चित्रशाळेतून बाप्पाची मूर्ती पाटावर ठेवून तो पाट मूर्तीसह डोक्यावर घेऊन वाजत गाजत घरी आणण्याची जुनी परंपरा आजही कोकणात सर्रास जोपासली जाते. अशीच परंपरा गेली सवाशे वर्षे सिंधुदुर्ग जिह्याच्या देवगड तालुक्यातील माझ्या गवाणे या अतिशय दुर्गम खेडेगावात आजही आनंदाने जोपासली जातेय.
माझ्या बालपणी आमचं घर कच्च्या मातीचं असल्याने गणेशोत्सवाची चाहूल म्हणून माझी आई मातीच्या भिंती गेरूने आणि जमीन शेणाने बबनकडून सारवून घेत असे. चतुर्थीच्या अगोदर आठ दिवस हमखास बाबांची मनीऑर्डर येणार हे ठरलेलं असे. बाबांनी पाठवलेल्या पैशांतून आई तळेरे येथील मंगळवारच्या आठवडी बाजारातून सणासाठी किरकोळ खरेदी करत असे. यावेळी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी आणि लगबग होत असे. कवंडळा कशी दिलं? कांगला कशी? हरणाचो वाटो दी, चिबूड हा? आडव्या बांदूक तोरान व्हया, फुला दी, येट्टम बॉम्ब, माळेचो बॉक्स कितीक? जोरात व्हाजता काय? लाइटिंगची माळ व्हयी, पेटवून दाखव.. असे एक ना चारशे व्यवहार आणि सतराशे वस्तू पिशवीत कोंबल्या जातात. आपल्या लाडक्या बाप्पासाठी काय चांगलं दिसेल, यंदा काय नवीन करता येईल, याचीच गणितं प्रत्येकाच्या डोळ्यात दिसतात. कोकणी माणूस आपला सण त्याच उत्साहात आणि दिमाखात साजरा करतो.
बाप्पावरची हीच श्रद्धा आणि कोकणातला हा साधेपणा सदैव असाच अढळ आहे. बाप्पा जिथे बसणार त्या भिंतीला मी पांढरा रंग मारून साईडने किनार देऊन मधोमध कमळाचं चित्र काढण्याचं काम आई माझ्यावर सोपवत असे. चतुर्थीच्या आदल्या दिवशी आईचा हरतालिकेचा कडक उपवास असूनही तिची सजावटीसाठी मोलाची मदत होतं असे. आमच्या घरच्या गणपतीचं मुख्य आकर्षण म्हणजे माटोळी किंवा मंडपी. बाप्पाच्या मूर्तीच्या वर छताला लाकडी चौकट बांधून त्याला जंगलातील विविध प्रकारची फळे, फुले, भाज्या आणि औषधी वनस्पती जसे की, हरणा, कांगणी, कुड्याची फुले, नारळ, कवंडळ, फोपळ, सोनतळ बांधल्या जातात. बाजारातील प्लास्टिकच्या साहित्याऐवजी केळीचे खांब, आंब्याची डहाळी आणि रानफुलांचा वापर करून नैसर्गिक सजावट केली जाते.
चतुर्थीच्या दिवशी सकाळी गावातीलच अनंत मेस्त्राr यांच्या चित्रशाळेतून दोन फुटी सुबक मूर्ती माझ्या घरी विराजमान होते. वडील आणि मोठे काका त्यांच्या कुटुंबासहीत उत्सवासाठी आलेले असल्याने आईची जेवणासाठी मोठी तारांबळ उडे. प्रथम घरच्या देवाची, त्यानंतर बाप्पाची यथासांग पूजाअर्चा झाल्यानंतर आरतीसाठी घरातील लहानथोर मंडळी एकत्र येऊन सुरात आरती म्हटली जायची.
कोकणात प्रत्येक वाडीचे स्वतचे भजनी मंडळ असते. रात्रीच्या वेळी एका घरून दुसऱया घरी जाऊन टाळ – मृदंगाच्या साथीने पारंपरिक भजने, जाखडी नृत्य, फुगड्या हे रात्रीच्या वेळी रंगतात, जे पाहण्यासाठी गाव एकत्र येतो. बाप्पाच्या आगमनानंतर दोन ते तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. या काळात घरातील महिला एकत्र येऊन जागरण म्हणून रात्रभर झिम्मा – फुगडी खेळतात. बाप्पाच्या प्रसादासाठी रोज उकडीचे मोदक, नेवऱया, पातोळ्या, खडखडे लाडू आणि पंचखाद्य बनवले जाते. भजनाच्या वेळी मात्र रात्री वाटाण्याची उसळपाव, पोहे किंवा गावातील पारंपरिक पद्धतीचे शाकाहारी जेवण दिले जाते. गौरी विसर्जनाच्या दिवशीच बाप्पाचेही ढोल – ताशाच्या गजरात नदीघाटावर विसर्जन केले जाते. कोकणातील ग्रामीण भागातील हा उत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून तो माणसांना जोडणारा, जुन्या आठवणींना उजाळा देणारा आणि निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करणारा अनोखा सोहळा ठरतोय.


























































