
>> अरूण
मगर आणि सुसर तसे एकाच प्रजातीचे जल-जीव. परंतु त्यांच्या जबड्याच्या रचनेत (स्नाउढट) मोठा फरक असतो. अॅलिगेटर म्हणजे मगर. मगरीचा जबडा पुढच्या बाजूने गोलाकार असतो तर सुसरीचा निमुळता किंवा मगरीचा इंग्लिश ‘यू’च्या आकाराचा (U) तर सुसरीचा टोकेरी (V) सारखा! सुसर म्हणजे क्रॉकोडाइल.
त्या दोघी ‘बहिणी’मधली साम्यस्थळ आणि फरक गंमतीचा-नवलाचा. मगर तोंड मिटते तेव्हा तिचे सगळे दात आतच सामावतात. सुसरीने मात्र ‘गप्प’ राहायचं ठरवलं तरी जबड्याच्या खालच्या भागाता चौथा दात बाहेरून दिसतो. बाकीचे वरचे-खालचे दात मात्र गच्च बसतात.
अॅलिगेटर (मगर) शक्यतो गोड्या पाण्यात राहणं पसंत करतात. आपल्याकडेही कोकणातल्या सावित्री किंवा पठारावरच्या कृष्णा नदीतील मगरीचं दर्शन, जवळपास राहणाऱयांना वारंवार होत असत. साधारण नदीमधल्या पाण्यात (डोहात) आणि जवळच्या ओलसर (स्वॅम्पी) वातावरणात राहायला मगरीना आवडतं. त्या थोडावेळ चालत जमिनीवरही येतात.
क्रॉकडाइल (सुसर) खाऱ्या पाण्यात राहू शकते. ही प्रजाती सागरकिनाऱ्याजवळच्या तिवरं (मॅनग्रोव्ह) असलेल्या भागात राहणं पसंत करते. मगर काळसर तपकीरी किंवा काळ्या रंगाची असते. सुसर मात्र काही शेवाळी रंगाकडे जाते. कदाचित खाऱ्या पाण्याचा परिणाम असेल. मगरी सहसा आपला निवास (अधिवास) सोडून पाण्याबाहेर पडत नाहीत. मात्र इजिप्तमधल्या नाइल नदीतील मगरी अनेकदा आक्रमक होतात. हा तिथल्या वाळवंटातील अतिउष्णतेचा परिणाम असू शकतो.
‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ असं म्हणत सुसरीच्या पाठीवरून पलीकडच्या तीराला चतुराईने जाणाऱया माकडाची कथा. मगरीची ‘त्वचा’ खडबडीत असली तरी सुसरीपेक्षा ‘सॉफ्ट’ असते. ‘रफ’ (खडबडीत) असते. मगरीपेक्षा सुसर लांबलचक वाढते आणि अधिक वजनदार असते. मगरीचं सरासरी वजन 225 ते 450 किलो तर सुसरीचं 400 ते 1000 किलो असतं. छोट्याशा मगरी-सुसरीसुद्धा 45 किलोच्या असतात.
मगर-सुसर जलजिवांवर जगतात. त्यामुळे नैसर्गिकरीत्या पर्यावरणाचा समतोल राखला जातो. हे दोन्ही जीव चिखलातच ‘घर’ (गॅटर होल) करून राहतात. आपल्याला या दोन्हीतला फरक चटकन लक्षात येत नाही, पण दोन वेगळ्या शब्दात त्याचं वेगळं रूप सांगितलं जातंच.





























































