
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने जुन्या नोंदी आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारीस्तरावर एका स्वतंत्र उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी केली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची विखे यांनी आज शनिवारी गॅलेक्सी रुग्णालयास भेट देऊन प्रकृतीची चौकशी केली. या भेटीनंतर विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनेक ठिकाणी जुनी कागदपत्रे आणि नोंदी मिळण्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे प्रमाणपत्रे वाटपात अडथळे येत होते. आता ही अडचण कायमस्वरूपी दूर होणार आहे.

























































