
येत्या 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत मुंबई महापालिका प्रशासनाकडून झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत 14 फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येईल. मात्र त्याआधी झोपडपट्टी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तिथे वास्तव्यास असलेल्या संबंधित रहिवाशांनी स्वतŠहून तात्काळ तोडावीत अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये एकूण 2 लाख 23 हजार 150 झोपड्या आहेत. त्यापैकी 39 हजार 111 झोपड्या 14 फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या असल्याचे निर्दशनास आले आहे. यापैकी 3 हजार 348 झोपड्या शहर विभाग, 4 हजार 536 झोपड्या पश्चिम उपनगरे आणि 31 हजार 227 झोपड्या पूर्व उपनगरांत आहेत.
दरम्यान, 4 हजार 584 झोपड्यांवर यापूर्वी निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. 611 झोपड्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित झोपड्यांत वास्तव्यास असलेल्या रहिवाश्यांनी संबंधित बांधकामे स्वत:हून तात्काळ निष्कासित करावीत अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
140 बांधकामे कारवाईच्या रडारवर
मुंबईत अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांकडून (वॉर्ड) सातत्याने कारवाई सुरू आहे. 24 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत एकूण 128 अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तर, 140 अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई नियोजित आहे. नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत तसेच अशाप्रकारचे बांधकाम केले असल्यास ते स्वतŠहून तात्काळ हटवावेत. अन्यथा, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.





























































