
मुंबई आणि उपनगरांत वायू प्रदूषणाची चिंता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वायू प्रदूषणाच्या अनुषंगाने, पालिकेकडून जारी 28 मुद्दय़ांचा समावेश असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.
येत्या 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत विशेष अभियान राबवून रस्ते धुणे, मोठय़ा प्रकल्पांभोवती आवरण लावली जाणार आहेत. वायू गुणवत्ता निर्देशांक वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱया मोठय़ा प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱयाची नेमणूक करावी, असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. विविध विभाग, खात्यांचे कामकाज, प्रकल्प आणि उपक्रम आदींबाबत महापालिका मुख्यालयात शुक्रवारी मासिक आढावा बैठक पार पडली.
आगामी काळात वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम नियोजन करून त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
मुंबई महापालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी सुमारे 307 किलोमीटर लांबीच्या 200 पदपथांची निवड केली आहे.
तक्रारींच्या व्यवस्थापनासाठी महापालिकेने ‘मार्ग’ प्रणाली आणली आहे. या प्रणालीवर आतापर्यंत 87 हजार 04 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी सुमारे 64 टक्के तक्रारींचे निराकरण झाले आहे.
बृहन्मुंबई क्षेत्रात काही ठिकाणांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. अशाप्रकारची सुमारे 139 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.





























































