
गौरी-गणपतीच्या सणासाठी गावाकडे सुट्टीवर येणाऱ्या मोठ्या भावाला आणण्यासाठी उत्साहाने निघालेल्या दोन तरुण मित्रांवर काळाने भीषण घाला घातला. निटूर ते शिरोळ मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात होऊन दोन १८ वर्षीय तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कलांडी पाटीजवळ घडली. सणासुदीच्या दिवसांत घडलेल्या या घटनेमुळे शिरोळ-वांजरवाडा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बळीराम कचरू धडे (वय १८) आणि वेदांत नागनाथ डिगरे (वय १८, दोघे रा. शिरोळ-वांजरवाडा, ता. निलंगा, जि. लातूर) अशी मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बळीरामचा मोठा भाऊ कृष्णा हा सणासाठी गावाकडे येत होता. त्याला निटूर मोड येथून घेऊन येण्यासाठी बळीराम आणि त्याचा मित्र वेदांत हे दोघे होंडा युनिकॉर्न दुचाकीवरून (क्रमांक: MH-05 DV-7934) निटूरच्या दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान कलांडी पाटीच्या पुढे लिंबराज बनसोडे यांच्या शेताजवळ चालकाचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यातील सिमेंटच्या कणगीवर अत्यंत जोरात जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही तरुणांचा गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला.
लातूरहून फॉरेन्सिक पथक दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी निटूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. मृत बळीरामचे वडील कचरू शिवाजी धडे (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निटूर पोलीस चौकीत आ.प्र. क्रमांक ३१/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार (BNSS) घटनेची नोंद करण्यात आली आहे. अपघाताचे नेमके कारण समोर यावे यासाठी पोलीस उपअधीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर शिंदे करत आहेत.






























































