
घराघरात चैतन्य पसरवून, सुख, शांती व समृद्धीचा आशीर्वाद देऊन सहा दिवसांच्या मुक्कामानंतर लाडका बाप्पा शनिवारी आपल्या गावी निघाला. गणरायापाठोपाठ गौराई आली, तीही माहेरचा पाहुणचार घेऊन आज परतीच्या प्रवासाला निघाली. मुंबईसह राज्यभरात गौरी-गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. ‘बाप्पा मोरया!’चा जयघोष करतानाच गणेशभक्तांच्या डोळ्यांत पाणी आणि मनात पुढच्या वर्षी लवकर भेटण्याची आस दिसून आली. गिरगाव चौपाटी, दादर, वरळी, पवई तलाव आणि मुंबईतील शेकडो कृत्रिम तलावांच्या ठिकाणी वातावरण भक्तिमय झाले.
14 सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थीला सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता श्रीगणेशाचे आगमन वाजतगाजत, नाचत आणि फटाके वाजवत झाले होते. दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर गौरी-गणपतींच्या विसर्जनाची वेळ आली. अवघी मुंबापुरी भक्तिभावात न्हाऊन निघाली. मुंबईतील कृत्रिम तलाव परिसरात गणपती विसर्जनासाठी भाविकांनी दुपारनंतर गर्दी केली. विसर्जन मार्गांवर ढोल-ताशांचा गजर सुरू होता. भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. गणरायासोबत गौरी थाटामाटात विसर्जनस्थळी रवाना झाल्या. मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांच्या तालावर आबालवृद्धांनी फेर धरला. फुलांची आणि गुलालाची उधळण झाली. कृत्रिम तलाव परिसरात मोठी गर्दी झाली होती. गौरी-गणपतीची आरती करून, त्यांना नैवेद्याची शिदोरी देऊन आणि त्याचबरोबर मनातील इच्छा सांगून मावळत्या सूर्याच्या साक्षीने भक्तांनी हळूवार निरोप दिला.
मुंबई महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून समुद्र, नैसर्गिक तलाव या ठिकाणी मुंबई शहर आणि उपनगरातील 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई केली आहे. त्यासाठी पालिकेने 383 हून अधिक कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवक यांची फौज तैनात होती.
गणेश भक्तांची गर्दी लोटल्याने रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रात्री 9 वाजेपर्यंतची आकडेवारी
- सार्वजनिक गणेशमूर्ती 62
- घरगुती गणेशमूर्ती 18,308
- गौरी 2,734
- एकूण गणेशमूर्ती 21,104





























































