
>> मनोज रानडे
गणराय… अर्थात विश्वतारक! आखातासह जगभरात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी या विश्वतारकापुढे विश्वाला तारण्याचे साकडे घातले आहे. मायभूमीच्या मातीतील गणेशोत्सवाची परंपरा परदेशातील भूमीत जपत हे बांधव यंदाही मनोभावे उत्सव साजरा करीत आहेत. तथापि, अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धामुळे अवघ्या जगावर ओढवलेल्या भयंकर अरिष्टाच्या पाश्र्वभूमीवर जगभरातील मराठी बांधवांनी ‘युद्धाचे हे विघ्न दूर कर!’ अशी प्रार्थना बाप्पाचरणी केली आहे.
अमेरिका-इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हल्ले सुरू केले. इराणनेही त्याला प्रत्युत्तर दिले. इराणने मध्य-पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांनाही लक्ष्य केले. दुबई, अबुधाबी, सौदी अरेबिया, जॉर्डन, कतार, बहरीन येथेही जबदस्त हवाई हल्ले चढवले. त्यामुळे जगात सर्वत्र हाहाकार माजला होता. परदेशांत स्थायिक झालेल्या मराठी बांधवांचीही या युद्धामुळे चिंता वाढली होती. गणेशोत्सवावर या युद्धाचे पडसाद उमटणार का? हा उत्सव साजरा करता येईल की नाही? याबद्दल साशंकता होती. मात्र, अशा सर्व परिस्थितीत हा पारंपरिक उत्सव साध्या पद्धतीने का होईना, साजरा करण्याचा निर्धार मराठी बांधवानी केला.
श्रीगणेश हे सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत! महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील विविध देशांमध्ये स्थायिक झालेली मराठी कुटुंबे हा उत्सव तेवढ्याच जल्लोषात साजरा करतात. केवळ गणेशोत्सव नव्हे, तर नवरात्र, दसरा-दिवाळी, आषाढी एकादशी, गुढीपाडवा, शिवजयंती, शिवराज्याभिषेक दिन सोहळा, कोजागरी पौर्णिमा, भोंडला, मंगळागौर आणि अन्य सण-उत्सवही तेथे उत्साहात साजरे केले जातात.
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि अन्य देशांमध्ये मराठी कुटुंबे स्थायिक झाली आहेत. काही वर्षांपूर्वी ही संख्या कमी होती. आता मात्र परदेशांत मराठी टक्का मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. परदेशात स्थायिक झाले असले, तरी मराठी कुटुंबीयांनी हिंदुस्थानी संस्कृतीबरोबरच महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाही जपला आहे.
डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ काँगो या दक्षिण आफ्रिकेतील हा लहानशा देशात सर्वधर्मीय नागरिक एकत्र राहतात. ख्रिश्चन समाजाची लोकवस्ती अधिक आहे. काही हिंदुस्थानीही कामाच्या निमित्ताने येथे स्थिरावले आहेत. ते मोठ्या उत्साहात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरा करतात. साधारण दोन-अडीच हजार लोक यानिमित्ताने एकत्र जमतात. सांस्कृतिक कार्यक्रमही रंगतात.
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात गणेशोत्सव आणि अन्य धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. हेलन्सबर्ग, लिव्हरपूलमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा केला जातो. तेथे काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. यामध्ये महाराष्ट्रीयांबरोबरच कन्नड, गुजराती, तेलुगू, तामीळ, मल्याळी, तसेच श्रीलंकन नागरिकही सहभागी होतात. गणेशोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा होतो. महाराष्ट्र मंडळातर्फे या उत्सवाचे नियोजन केले जाते.
- ‘आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे। तोषोनि मज द्यावे । पसायदान हे।’ संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींनी विश्वकल्याणासाठी मागितलेले हे पसायदान म्हणजे मानवतेच्या कल्याणाची आणि विश्वशांतीची प्रार्थना आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी मागितलेले हे ‘पसायदान’ आजही विश्वशांतीसाठी तितकेच अर्थपूर्ण आणि मार्गदर्शक आहे.
दुबई आणि अबुधाबीत साधारणतः ७०० ते ८०० मराठी कुटुंबे गणेशोत्सव साजरा करतात. घरोघरी हा उत्सव अत्यंत दिमाखात साजरा होतो. पुणे, मुंबई, कोकण येथून महिनाभरापूर्वीच ‘श्रीं’च्या मूर्ती मागविण्यात येतात. पौरोहित्य करणारे पाच ते सहाजण तेथे आहेत. ते घरोघरी जाऊन विधिवत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करतात.
अमेरिकेतही लाखो मराठी बांधव स्थायिक झाले आहेत. तेही अत्यंत उत्साहाने गणेशोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवितात. तेथे गणरायाचे जल्लोषात स्वागत केले जाते. न्यू जर्सी येथील एका भव्य हॉलमध्ये श्री गणरायाची प्रतिष्ठापना, पूजा, अभिषेक, आरती आणि सर्व धार्मिक विधी केले जातात. सायंकाळी ५ ते १० या वेळात सर्व मराठी बांधव तेथे जमतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
‘पुण्याच्या लष्कर भागातील हिंद तरुण मंडळाचा मी कार्यकर्ता आहे. मी १८ वर्षांपूर्वी अटलांटा येथे स्थायिक झालो, तर माझे बंधू सुबोध दिकोंडा हे सहा वर्षांपूर्वी न्यू जर्सीमध्ये स्थायिक झाले. आपल्या मातीपासून दूर असल्याची जाणीव सतत होते. मात्र, संस्कृती जपून होणाऱ्या गणेशोत्सवातून मातीची नाळ जपण्याचा प्रयत्न मराठी बांधव करतात. सात दिवसांचा हा उत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो,’ असे सांगणारे उमेश दिकोंडा अटलांटा येथे इंजिनीअर आहेत. ‘गणेशोत्सवात मी सहकुटुंब न्यू जर्सीमधील माझे बंधू सुबोध ब्रह्मानंद दिकोंडा यांच्या घरी जातो. सुबोधची पत्नी सुमा, मुलगी अतिका, माझी पत्नी शीतल आणि मुलगी सौरभी हे सजावट आणि नैवेद्याची जबाबदारी पार पाडतात,’ असे उमेश दिकोंडा यांनी सांगितले.





























































