
धर्मवीर स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवरच्या लोटस जेट्टी येथे आज पहाटे बीएमडब्ल्यू या वाहनाचा अपघात झाला. कोस्टल रोडच्या पुलावरून बीएमडब्ल्यू कार थेट 50 फूट खाली कोसळली. त्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. धैर्य शेठ, आदित्य जकासनिया आणि शनय गुजर अशी मृतांची नावे आहेत. तर आदित्य ओसवाल हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ते आज पहाटे फेरफटका मारून घरी परतत असताना हा अपघात झाला. कोस्टल रोडवरून बीएमडब्ल्यू गाडी खाली कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
धैर्य शेठ, शनय गुजर, आदित्य जकासनिया आणि आदित्य ओसवाल मूळचे गुजरातच्या अहमदाबादचे रहिवासी असून ते जुहू येथील एका खासगी शिक्षण संस्थेत शिकत होते. ते जुहू येथील एका पेईंग गेस्ट मध्ये राहत होते. शनिवारी रात्री ते मरीन ड्राइव्हला फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. शनय हा वाहन चालवत होता. तर शनयच्या बाजूला आदित्य ओसवाल हा बसला होता. मागील सीटवर धैर्य शेठ आणि आदित्य जकासनिया हे बसले होते. मरीन ड्राइव्हवर काही तास घालवल्यानंतर ते जुहू येथे जाण्यास निघाले. ते कोस्टल रोड येथून जुहूच्या दिशेने जात होते.
आज पहाटे 5.20 च्या सुमारास कोस्टल रोडच्या उत्तरेकडून जाणाऱया मार्गिकेवर (नॉर्थ बॉउंड) लोटस जेटीजवळ त्यांची कार आली. काळ्या रंगाची बीएमडब्लू कार सुसाट वेगात होती. कारने बॅरिकेट तोडून ती 50 फूट खाली बांधकाम सुरू असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी कोसळली. या घटनेची माहिती कोस्टल रूमच्या नियंत्रण कक्षाकडून ताडदेव पोलिसांना देण्यात आली. काही वेळात ताडदेव पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी चक्काचूर झालेल्या गाडीतून त्या चौघांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी गुजर, जकासनिया, सेठला मृत घोषित केले. तर ओसवालला अनेक जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
- शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुजर विरोधात गुन्हा दाखल केला जाईल.
- अपघातानंतर फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी
- प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी (आरटीओ) चे पथक देखील गाडीची तपासणी करणार
- त्या तिघांचा मृत्यू हा तांत्रिक बिघाडामुळे की मानवी चुकांमुळे हे स्पष्ट होईल.
नियंत्रण सुटल्याने अपघात?
अपघातग्रस्त कार ही 120 किमीच्या वेगाने जात होती. लोटस जेट्टी येथील तीव्र वळणावर वाहनाचे नियंत्रण सुटले. कार पुलाच्या भिंतीवर आदळली. त्यानंतर ती भिंत तोडून खाली कोसळली. नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जाते. ती अपघातग्रस्त कार गुजरच्या मालकीची असल्याचे समजते. गुजर हा अनेकदा फेरफटका मारण्यासाठी रात्री मरीन ड्राइव्हला जायचा.






























































