‘मलईदार’ विभागात वर्षानुवर्षे ठाण; मुंबई महापालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेने बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन केल्याने वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱयांना चांगलाच दणका बसला आहे. या ऑनलाईन प्रक्रियेमुळे अशा जवळपास 800 अभियंत्यांची येत्या महिनाभरात उचलबांगडी होणार आहे. त्यामुळे नव्या अधिकाऱयांच्या नियुक्तीलाच वाव मिळणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत अभियंता पद म्हणजे सोन्याचे अंडे देणारी काsंबडी असे गणले जाते. त्यातच काही ठराविक मलईदार विभागांमध्ये अभियंता पद मिळाले तर भ्रष्टाचाऱयांच्या दुनियेत सोन्याहून पिवळे समजले जाते. अशा पदांवर नियुक्तीसाठी तशीच वजनदार रक्कम मोजायलाही पुढेमागे पाहिले जात नाही. या भ्रष्ट संस्कृतीला आता ऑनलाईन बदली प्रक्रियेने चाप बसणार आहे. महापालिकेच्या नियमानुसार एकाच खात्यात किंवा विभागात 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांपैकी एकूण कर्मचाऱयांच्या 25 टक्के कर्मचाऱयांच्या बदल्या दरवर्षी 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत करण्याची तरतूद आहे. मात्र 10 ते 17 वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले अनेक अभियंते ही ऑनलाईन प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी दबाव आणत असल्याचे दिसत आहे. इंजिनिअर्स असोसिएशननेही या अनुषंगाने प्रशासनाला पत्र लिहिले आहे. नवीन अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगला विरोध होत असल्याने ‘नवीन लोकांनी जायचे कुठे?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन ऑनलाईन बदल्यांवर ठाम आहे.

1 ऑक्टोबरपासून  जारी होणार बदल्यांचे आदेश

आतापर्यंत आलेले अर्ज आणि रिक्त पदांची स्थिती पाहता 18 सप्टेंबरपर्यंत बदल्यांसाठी एकूण 494 अर्ज दाखल झाले आहेत. 20 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. ऑनलाईन अर्जांची छाननी झाल्यानंतर 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले जाणार आहेत. वशिले लावून पालिकेच्या विविध विभागांत अनेक वर्षांपासून जम बसवलेल्या अभियंत्यांचे या ऑनलाईन प्रक्रियेमुळे धाबे दणाणले आहेत.

वशिला चालणार नाही

ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये सर्व अभियंत्यांचा वैयक्तिक डेटा आणि पालिकेतील रिक्त पदांची माहिती फीड करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही वशिल्याशिवाय संगणकीय पद्धतीद्वारे या बदल्या पूर्ण केल्या जातील. बदलीस पात्र अभियंत्यांना 5 ते 20 सप्टेंबर 2026 दरम्यान ऑनलाईन अर्ज करून आपल्या पसंतीचे 5 प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे.