
पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्यात होणाऱया पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेली विरोधी पक्षांची मुस्कटदाबी सुरूच आहे. आज आणखी एका विरोधी उमेदवाराला पाच वर्षे जुन्या प्रकरणावरून अटक करण्यात आली. रेजीनगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सैफुल इस्लाम यांना पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. वर्ष 2021 मध्ये निवडणुकीदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या वादाप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बंगालमध्ये नंदीग्राम आणि रेजीनगर येथे पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही मतदारसंघांत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन दिवसांपूर्वी नंदीग्राम येथील काँग्रेसचे उमेदवार मिलन प्राधान यांना सुमारे 20 वर्षांपूर्वीच्या एका जमिनीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. बेहरामपूर पोलिसांनी सैफुल इस्लाम यांना अटक केली. सैफुल इस्लाम हे हंमायूं कबीर यांच्या आम जनता उन्नयन पक्षाशी संबंधित होते. 2021 मधील प्रकरणामध्ये 14 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.






























































