टीईटी पेपरफुटी प्रकरणी दोन फरार आरोपींना अटक, आतापर्यंत 18 जण जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणाऱया टीईटी पेपरफुटी प्रकरणी आज दोन फरार आरोपींना भिवंडी पोलिसांनी अटक केली. प्रकाश मिसाळ व अशोकुमार शाव अशी त्यांची नावे आहेत. मिसाळ याला बीडमधून तर शाव यास दिल्लीतून ताब्यात घेतले असून या दोघांनाही न्यायालयाने 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अटक झालेल्या एकूण आरोपींची संख्या 18 झाली आहे.

टीईटी पेपरफुटी प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी कपिल दहिया हा प्रकाश मिसाळ याला पुणे येथे भेटण्यासाठी आला होता. एका हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली होती. त्यावेळी टीईटी परीक्षेच्या पेपर संदर्भातील खरेदी-विक्री बद्दल या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी अशोककुमार शाव हा सोलापूर येथून अटक केलेल्या प्रकाश पवार याच्या संपर्कात होता. पटना येथील त्याच्या राहत्या घरातून तपास पथकाला 149 परीक्षार्थींच्या नावाची यादी पोलिसांनी जप्त केली आहे.

महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता

आरोपींनी काही आर्थिक व्यवहार केले आहेत का यासंदर्भात पोलीस तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त विजय मराठे यांनी दिली. पोलीस तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे सहायक पोलीस आयुक्त विजय मराठे यांनी सांगितले.