
स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो तरुणांचे भविष्य अंधारात सापडले आहे. याविरोधात मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज रविवारी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, जोपर्यंत एमपीएससीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा दिपके यांने दिला. सरकारला केवळ मतांची भाषा समजते; त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून ही ताकद दाखवून दिली पाहिजे, असेही दिपके म्हणाले.
एकजुटीचे आवाहन
पुणे, विदर्भ आणि मराठवाडा अशा वेगवेगळ्या भागात विखुरण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले. हा लढा आठवडाभर चालेल की महिनाभर, याची पर्वा न करता शेवटपर्यंत टिकून राहण्याची तयारी ठेवा, मी स्वतŠ तुमच्यासोबत बसून राहीन, असा विश्वासही दिपके याने बोलून दाखविला.




























































