
सीमाभागासह सुमारे ४० गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा आधार असलेल्या वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभारच सलाईनवर पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे वलांडी हा जि.प. च्या विद्यमान अध्यक्षा ऊषा पाटील यांचा मतदार संघ असून आरोग्य सेवेची ईथे ही वाताहत कशी काय ? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.
वलांडी प्राथमिक केंन्द्रात दररोज २०० हून अधिक रुग्णांची तपासणी, तर शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी सुमारे ४०० रुग्णांची गर्दी होत असतानाही केंद्रातील रिक्त पदे, अपुरे मनुष्यबळ, शवविच्छेदन साठीचा कर्मचारीही नाही औषधांचा तुटवडा आत्यावश्यक सुविधांचा अभाव कायम आहे. परिणामी उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाच गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
वलांडी, जवळगा, धनेगाव, कवठाळा, वडमुरंबी आणि दवणहिप्परगा या उपकेंद्रांसह परिसरातील नागरिक या केंद्रावर अवलंबून आहेत. वलांडी हे कर्नाटक सीमेवरील प्रमुख बाजारपेठ असल्याने सीमाभागातील नागरिकही उपचार,व खास करून प्रसूती आणि इतर आरोग्य सेवांसाठी येथे येतात. एवढा मोठा आरोग्यभार असतानाही दोन वैद्यकीय अधिकारी पदांपैकी एक महिला वैद्यकीय अधिकारी प्रसूती रजेवर असल्याने सध्या एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावरच मोठा कारभार येऊन पडला आहे.
आरोग्यसेविका, शिपाई, तंत्रज्ञ यांसह विविध पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. विशेषतः रक्त तपासणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरील खासगी यंत्रणांचा आधार घ्यावा लागत आहे. रोजच्या रुग्ण तपासणीवर त्याचा थेट परिणाम होत असून, उपचारासाठी आलेल्या गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचीही गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रसूतीनंतर घडलेल्या काही दुर्घटनांमुळे महिला आणि नवजात बाळांना त्रास सहन करावा लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रसूती सेवांबाबत सुरक्षितता आणि आवश्यक मनुष्यबळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुटुंब कल्याणाच्या शस्त्रक्रियाही मोठ्या प्रमाणात होत असताना मूलभूत सुविधांकडे होणारे दुर्लक्ष गंभीर ठरत आहे.
औषधांचा तुटवडाही रुग्णांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत आहे. आवश्यक औषधांची मागणी केल्यानंतर ‘सध्या एवढीच औषधे उपलब्ध झाली आहेत’, असे उत्तर दिले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सरकारी आरोग्य केंद्रात मोफत उपचाराच्या अपेक्षेने येणाऱ्या रुग्णांना औषधे व तपासण्यांसाठी खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागत असल्याने ‘सरकारी आरोग्यसेवा नेमकी कोणासाठी?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रिक्त पदे भरणे, कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती, आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि केंद्रातील कारभार सुरळीत करण्याबाबत नागरिकांनी यापूर्वीही वारंवार आवाज उठविला आहे. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभागाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका आरोग्य यंत्रणेकडून ठोस दखल घेतली जात नसल्याची नाराजी आहे. ४० गावांचा आरोग्यभार पेलणाऱ्या केंद्राकडेच प्रशासनाने पाठ फिरवली तर ग्रामीण भागातील नागरिकांनी उपचारासाठी कुठे जावे? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
आरोग्य केंद्र की रेफरल केंद्र?
रुग्णांची वाढती संख्या पाहता वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अधिक सक्षम करण्याची गरज असताना उलट मनुष्यबळ आणि सुविधांचा तुटवडा वाढत आहे. प्रशासनाने तातडीने रिक्त पदे भरावीत, आवश्यक तंत्रज्ञ व आरोग्यसेविका उपलब्ध करून द्याव्यात, औषधांचा पुरेसा साठा ठेवावा आणि प्रसूती सेवा सुरक्षित व सक्षम कराव्यात. अन्यथा ‘उपचारासाठी आलेल्या रुग्णांना खासगी दवाखान्याचा रस्ता दाखविणारे सरकारी आरोग्य केंद्र’ अशी या केंद्राची ओळख होण्याची वेळ येऊ शकते.
देवणी तालुक्यातील वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असते. केंद्रात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे असून सध्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यावरच कामकाजाचा भार आहे. तसेच सेवक व इतर काही पदे रिक्त असल्याचे तसा अहवाल वरिष्टांना पाठवल्याची माहीती
डॉ. रामचंद्र मोहिते,तालुका आरोग्य अधिकारी, देवणी
जिल्हा परिषद बैठकीत विषय मांडणार : उषाताई पाटील
जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर यांनी सांगितले की, वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या आगामी जिल्हा परिषद बैठकीत मांडण्यात येतील. केंद्रातील रिक्त पदे, मनुष्यबळ तसेच आवश्यक आरोग्य सुविधांबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

























































