
हो चि मिन्ह सिटीहून कोलंबोला जाणाऱ्या व्हिएतनाम एअरलाईन्सच्या विमानाचे इंजिन निकामी झाल्याने चेन्नईत विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान सुखरुप चेन्नई विमानतळावर उतरण्यात आले. विमान उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यानंतर विमान तपासणीसाठी बे मध्ये नेण्यात आले.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, व्हिएतनाम एअरलाईन्सचे एअरबस A320 विमान मंगळवारी हो चि मिन्ह सिटीहून कोलंबोला चालले होते. विमानात 143 प्रवासी होते. प्रवासादरम्यान विमानाचे एक इंजिन निकामी झाले. यानंतर चेन्नई विमानतळाला माहिती देण्यात आली. चेन्नई विमानतळावर फुल इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चेन्नई विमानतळावर विमान सुरक्षित उतरले.
विमान उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत विमान बे मध्ये नेण्यात आले. यानंतर विमानतळाचे कामकाज पूर्ववत झाल्यानंतर रात्री 11.35 च्या सुमारास फुल इमर्जन्सी मागे घेण्यात आली. या घटनेनंतर व्हिएतनाम एअरलाईन्सने प्रवाशांना कोलंबोला नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली.

























































