रशियाकडून तेल खरेदी थांबवणे इतके सोपे नाही, निर्मला सीतारामन यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाकडून तेल खरेदी केल्यास हिंदुस्थानवर 100 टक्के टॅरिफ लावू, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. यावर अखेर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मौन सोडले आहे. रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवणे इतके सोपे नाही, असे विधान त्यांनी केले आहे. हिंदुस्थान अचानक रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद करू शकत नाही आणि लगेच इतर पुरवठादारांकडे वळू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.

एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, देशातील 140 कोटी लोकांच्या ऊर्जेच्या गरजा आणि देशांतर्गत ऊर्जा सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदुस्थानसाठी देशहीत सर्वात महत्त्वाचे आहे. ज्या ज्या ठिकाणाहून तेल सहजपणे आणि योग्य अटींवर उपलब्ध होईल त्या जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून हिंदुस्थान तेल खरेदी करेल, यात कोणतीही शंका नाही. हिंदुस्थानने जर रशियाऐवजी अन्य ठिकाणाहून तेल खरेदी केल्यास बाजारात उपलब्ध तेलाचा मर्यादित साठा आणखी कमी होऊन किमती अतिशय वेगाने वाढतील, असा इशाराही निर्मला सीतारामन यांनी यावेळी दिला.

तेलाच्या साठ्यात घट

जर आपण वास्तववादी दृष्टिकोनातून पाहिले तर सौदी अरबवर झालेले हल्ले आणि आखाती प्रदेशातील काही रिफायनरींमध्ये आलेल्या अडचणींमुळे तेलाचा साठा आपोआप कमी होत आहे, असेही त्या म्हणाल्या.