
बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाईचा बडगा, अपघातांच्या ब्लॉक स्पॉटवर लावलेले सूचना फलक, पोलिसांची पेट्रोलिंग तसेच वाहनचालकांचे केलेले समुपदेशन यामुळे बोरघाट सेफ्टी झोन झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात गेल्या १०० दिवसांत एकही अपघाती मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे अपघातांसाठी हॉटस्पॉट असलेल्या एक्स्प्रेस वेवर अपघातांना ब्रेक लागला असून महामार्ग पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांना मोठे यश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई-पुणे या दोन महानगरांना जोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या द्रुतगती महामार्गावर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. यामध्ये शेकडो वाहनचालकांसह प्रवाशांचा बळी गेला असून हजारो प्रवासी जायबंदी झाले आहेत. नागमोडी वळणे, अतिवेग तसेच काही बेशिस्त वाहनचालकांमुळे ही अपघाताची मालिका सुरू होती. त्यासाठी वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे, पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपअधीक्षक पुष्पलता दिघे, पोलीस निरीक्षक भरत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरघाट महामार्ग पोलीस यंत्रणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील यांच्या पथकाने विविध उपाययोजना राबवल्या. त्यामुळे बोरघाटात १०० दिवसांत अपघातात एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
– अपघातांना ब्रेक लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाहनचालकांचे केलेले समुपदेशन महत्त्वाचे ठरले आहे.
– वेगमर्यादा, सुरक्षित अंतर, धोकादायक ओव्हरटेक, गाडी चालवताना मोबाईलचा वापर यांसह दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने अपघात कमी झाले आहेत.
– जुलै महिन्यात ६ हजार ८७६, ऑगस्टमध्ये ९ हजार ७४३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यात ९४ मद्यपी चालकांचा समावेश आहे.
सूचना आणि सावधानतेचे फलक
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक आणि संवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
– वाहनचालकांना संभाव्य धोके आधीच लक्षात यावेत यासाठी सूचना आणि सावधानतेचे फलक लावण्यात आले आहेत.
– महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट निश्चित करून वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासोबतच आवश्यकतेनुसार वाहतूक नियमन करण्यात येत आहे.



























































