मंत्र्यांनी दौरा केल्यानंतरच मदत जाहीर करायची, हे कशासाठी? पंचनाम्याचा फार्स नको, दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुपर अल-निनोचा होणारा संभाव्य परिणाम माहीत असतानाही सरकारने कोणतीच तयारी न करता शेतकऱ्यांबद्दल अनास्था दाखवल्याचा गंभीर आरोप करत, मंत्र्यांनी दौरा केल्यानंतरच मदत जाहीर करायची हे कशासाठी, असा सवाल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांवर कोसळलेले भीषण संकट पाहता पंचनाम्याचा फार्स न करता सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, बी-बियाणे मोफत द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यात अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याततही चार-पाच तालुक्यांत याची झळ जाणवत आहे. पण, सरकार शेतकऱ्यांबद्दल प्रचंड उदासीन असल्याचे दिसत आहे. शेजारील कर्नाटक सरकारने दुष्काळग्रस्तांना मदत दिली; पण आमचे सरकार झोपले आहे. मंत्र्यांनी दौरा केल्यानंतर मगच मदत जाहीर करायची, हे कशासाठी? ही श्रेयवादाची लढाई सुरू आहे का, असा सवालही आमदार पाटील यांनी केला.
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती नगरसेवकांच्या वारंवार होणाऱ्या हमरी-तुमरीच्या प्रकारावरून आता प्रत्येक सर्वसाधारणसभेसाठी चौकात पोलीस बंदोबस्त द्या, असे आयुक्तांना पत्र देण्याची वेळ आली आहे, असे सतेज पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी बांधावर मदतीचा अध्यादेश घेऊन जायला हवे
एकीकडे नियम डावलून लाडक्या बहिणींना अनुदान दिले. शक्तिपीठ महामार्ग रेटला जात आहे. मग शेतकऱ्यांना मदत करतानाच या सरकारला नियम का आठवतो, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना थेट मदतीचा अध्यादेश घेऊन जावे, असा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.
निधीअभावी महायुतीच्या सदस्यांना आता सत्तेचा पश्चाताप

जिल्हा परिषद, महापालिका सभागृह अस्तित्वात येऊन वर्ष होत आले तरी सदस्यांना एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही. जिल्ह्याततील दहा आमदारांच्या सदस्यांच्या हक्काचा हा निधी पळवून नेत असल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप होत आहे. जिल्हा परिषदेच्या 51 सदस्यांनी निधी मिळत नसल्याची तक्रार केली आहे. सत्तेत येऊन चूक झाल्याची भावना त्यांच्यात तयार होत आहे. महापालिकेतही हीच परिस्थिती आहे. आलेला निधी आमदारच घेऊन जात असल्याने सदस्यांना सत्तेचा पश्चाताप होत असल्याचा दावाही आमदार पाटील यांनी केला.