
मध्यरात्रीची वेळ…ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरात किर्रर्र अंधार… आजूबाजूच्या वस्तीतील रहिवासीही गाढ झोपेत होते. त्याचवेळी बिबट्या ‘राऊंड अप’ करताना काही नागरिकांना दिसला. क्षणाचाही विलंब न करता एका नागरिकाने या बिबट्याच्या हालचाली आपल्या मोबाईलमध्ये कैद केल्या. हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात परिसरात आला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रामनगर परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असल्याने याठिकाणी नेहमीच बिबट्यांचे दर्शन होते. भक्ष्याच्या शोधात बिबट्या परिसरात येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. गेल्या महिन्यात याच परिसरात बिबट्या दिसला होता. रामनगर रोड नंबर २४ मध्ये पुन्हा बिबट्या आल्याने नागरिकाने त्याचे चित्रीकरण केले. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जेरबंद करण्याची मागणी
बिबट्याची दहशत इतकी वाढली आहे की, नागरिक सातनंतर घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची आणि परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आणि सुरक्षित अंतर राखून सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच लहान मुलांना सायंकाळच्या वेळी एकटे सोडू नये, असेही आवाहन वनविभागाने केले आहे.
- चार महिन्यांपूर्वी वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर भागात आढळलेल्या जखमी नर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले होते. चार ते पाच वर्षे वयाच्या या बिबट्याच्या चारही पंजांच्या तळव्यांवर, मागील पायावर तसेच शरीर आणि शेपटीवर जखमा व व्रण आढळून आले होते.
- वागळे इस्टेट परिसरातील डोंगर पायथ्याजवळ असलेल्या कैलासनगर येथे बिबट्या शतपावली करताना दिसून आला होता. रहिवासी वस्तीत बिबट्याचा स्वैर संचार आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भक्ष्याच्या शोधात बिबट्या आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
- कचरा किंवा अन्न उघड्यावर ठेवू नये, कारण त्यामुळे वन्यप्राणी आकर्षित होण्याची शक्यता असते. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ वनविभाग, पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि शेजाऱ्यांनाही याबाबत माहिती देऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही वनविभागाने केले आहे.






























































