
वाहतूक पोलिसांच्या चिरीमिरी कारभारामुळे डोंबिवली बेशिस्त वाहनचालकांकडून सर्रासपणे नियम पायदळी तुडवले जात आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून खाकीचा वचकच राहिला नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आवाज उठवत गाड्यांवरील काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट तसेच भररस्त्यात गाड्या उभ्या करून ट्रॅफिककोंडी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डोंबिवली शहरात वाहनांवरील नियमबाह्य काळ्या काचा, बेकायदा फॅन्सी नंबर प्लेट, सायरन आणि पोलीस लाईटचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. यामुळे गुन्हेगारी वाढली असून अशा मुजोर वाहनचालकांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख अभिजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम उपशहरप्रमुख राहुल चौधरी यांनी नुकतीच डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांना समस्यांबाबत निवेदन दिले आहे.
खासगी वाहनांवर नियमबाह्य काळ्या काचा तसेच टिंटेड ग्लासचा वापर केला जात असल्याने वाहनातील व्यक्ती किंवा हालचाली स्पष्टपणे दिसत नाहीत. अशा प्रकारामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याबरोबरच वाहनांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने संबंधित वाहनांची विशेष तपासणी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.
यावेळी शहरप्रमुख सुरेश परदेशी, विभागप्रमुख तसेच शिव आरोग्य सेना विधानसभा संघटक प्रवीण विरकूड, शाखाप्रमुख योगेश कुबल, प्रशांत कदम, अनिल विश्वकर्मा, उपशाखाप्रमुख सौरभ गुजर आदी पदाधिकारी उपस्थित होते.






























































