
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांना अनुसरून बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने गणपती विसर्जन मिरवणुका ध्वनीप्रदूषणमुक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने सार्वजनिक गणेश मंडळांना गणपती विसर्जन सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध, शांततेत तसेच कायद्याचे पालन करून पार पाडण्याचे आवाहन केले आहे. मंडळांनी कार्यकर्ते व स्वयंसेवकांच्या माध्यमातून मिरवणुकीमध्ये गर्दीचे नियोजन आणि इतर आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना समितीने केल्या आहेत.
गणरायाचा विसर्जन सोहळा अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. उत्सवाच्या संपूर्ण कालावधीत मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासन, पोलीस, महापालिका आणि समन्वय समितीच्या आवाहनांना अनुसरून सहकार्य केले आहे. याचदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण आणि हवा प्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. त्याला अनुसरून समन्वय समितीने सार्वजनिक गणेश मंडळांना नव्याने आवाहन केले आहे. उत्सवाच्या अंतिम टप्प्यातही आपली शिस्त आणि सामाजिक बांधिलकी कायम ठेवणे आवश्यक आहे, असे समितीने म्हटले असून विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी आपले कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून गर्दीचे नियोजन करावे, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, विद्युत रोषणाई व वायरची सुरक्षितता, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.
भक्ती असू द्या, पण बेभानपणा नको!
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत भक्ती असू द्या, पण बेभानपणा नको. उत्साह असू द्या, पण अतिरेक नको. संगीत असू द्या, पण ध्वनीप्रदूषण नको. मिरवणूक असू द्या, पण वाहतुकीला अडथळा नको. उत्सव असू द्या, पण कोणाच्याही सुरक्षिततेशी तडजोड नको, असा मौलिक सल्ला समन्वय समितीतर्फे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर आणि प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी दिला आहे.
गणेशोत्सवाची प्रतिष्ठा, सामाजिक जबाबदारी जपा
उच्च न्यायालयाच्या सूचनांकडे बंधन म्हणून न पाहता न्यायालयाच्या सूचनांचे पालन करीत गणेशोत्सवाची प्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदारी जपावी, त्यादृष्टीने विसर्जन मिरवणुकीत ध्वनीमर्यादा, परवानगीच्या अटी आणि लागू असलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. मोठय़ा आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असेही समितीने म्हटले आहे.



























































