
कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पुढील ४८ तासांत ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही, तर देशभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना दिपके यांनी हा इशारा दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आणि विरोधकांना लक्ष्य करून पराभूत करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
अभिजित दिपके म्हणाले, “भाजपला २०२४ च्या निवडणुकीत बहुमत मिळवता आले नाही. जेव्हा त्यांना बहुमत मिळवता आले नाही, तेव्हा त्यांच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले ‘४०० पार’चा नारा देऊनही ते २४० जागांवर घसरले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की देशाचा कल बदलत आहे आणि प्रादेशिक शक्ती अत्यंत ताकदीने पुढे आल्या आहेत. मग ते महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे असोत, राष्ट्रवादी काँग्रेस असो, एम. के. स्टॅलिन असोत, पिनाराई विजयन असोत, अरविंद केजरीवाल असोत किंवा ममता बॅनर्जी असोत; या सर्व मुख्यमंत्र्यांना एकामागून एक पराभूत करण्यात आले आहे. हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. यात तुम्हाला एक निश्चित पॅटर्न दिसून येईल. हे सर्व मुख्यमंत्री एकत्र आले होते आणि त्यांनी २०२४ मध्ये एकदिलाने प्रचार केला होता. मग एकामागून एक त्यांचा असा कसा पराभव झाला? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून ५०,००० मते वगळली (डिलीट केली) जातात आणि त्या सुमारे १५,००० मतांनी पराभूत होतात. एम. के. स्टॅलिन यांच्या मतदारसंघातून १ लाख मते वगळली जातात आणि ते सुमारे ४५,००० मतांनी हरतात. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या मतदारसंघातून ४०,००० मते वगळली जातात आणि त्यांचा सुमारे ४,००० ते ५,००० मतांनी पराभव होतो.”



























































