
>> पराग पोतदार
कृत्रिम बुद्धिमता क्षेत्रात संगण क्षेत्रातील ज्ञान असणे गरजेचेच परंतु त्यासाठी अभियंता व्हायलाच हवे हा निकष बाजूला ठेवत अनेक तरुण वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्यातीलच एक केरळचा राउल जॉन. वाणिज्य शाखेच्या या विद्यार्थ्याने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी एआय स्टार्टअप उभारला आहे.
ज्यावयात बहुतांश विद्यार्थी बारावीच्या परीक्षेची, महाविद्यालयाची आणि भविष्यातील करीअरची तयारी करत असतात, त्याच वयात केरळमधील 16 वर्षीय राउल जॉन अजू याने एआय क्षेत्रात स्वतची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाणिज्य शाखेत बारावीचे शिक्षण घेत असतानाच राउलने एआय आधारित स्वतचा उद्योग उभारला आहे. त्याच्या या कामाची दखल घेत अनेक माध्यमांनी त्याला ‘भारताचा एआय किड’ अशी ओळख दिली आहे.
राउलच्या प्रवासाचे वैशिष्टय़ म्हणजे, त्याने एआय शिकण्यासाठी इंजिनीअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्सची पारंपरिक शिक्षणाची वाट निवडलेली नाही. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्याने स्वतहून तंत्रज्ञान आणि एआय शिकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याला व्हिडीओ एडिटिंगची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्याच्या वडिलांना ‘अॅडोबी’ या तंत्रज्ञान कंपनीत नोकरी मिळाल्याने राउलला आधुनिक तंत्रज्ञानातील विविध साधने वापरण्याची संधी मिळाली. त्यातून त्याची एआय उत्सुकता अधिक वाढत गेली.
वयाच्या 12व्या वर्षी राउलने शाळेच्या विज्ञान प्रकल्पासाठी ‘मीबॉट’ नावाचा यंत्रमानव तयार केला. या छोटय़ा शालेय प्रकल्पातून सुरू झालेली त्याची तंत्रज्ञानातील आवड पुढे एआय आधारित विविध साधने तयार करण्यापर्यंत पोहोचली. राउलने ‘रेस्क्यू एआय’, ‘मीबॉट’, ‘झॅपगॅप’, ‘इन्व्हेस्टो एआय’ आणि ‘फीडफाय’ यांसह 15 हून अधिक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधने विकसित केल्याचे सांगितले जाते. या साधनांचा उपयोग प्रत्यक्ष जीवनातील विविध समस्या सोडवण्यासाठी केला जात आहे.
राउलच्या प्रवासातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे, त्याचे वडील अजू जोसेफ हे त्याच्याच उद्योगात काम करतात. त्यांना दरमहा सुमारे दोन लाख रुपये वेतन मिळते. मात्र, वडिलांना आपल्या उद्योगात कामावर घेण्यामागे केवळ कौटुंबिक नाते कारणीभूत नसल्याचे राउल सांगतो. अजू जोसेफ यांनी ‘अॅमेझॉन’, ‘अॅडोबी’, ‘विप्रो’ आणि ‘आयबीएम’ यांसारख्या मोठय़ा कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांचा अनेक वर्षांचा व्यावसायिक अनुभव राउलसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
याविषयी राउल म्हणतो, इंटरनेटच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात ज्ञान मिळवता येते; मात्र प्रत्यक्ष कामाचा अनुभव इंटरनेटवरून मिळत नाही. त्यामुळे वडिलांकडून मिळणारे मार्गदर्शन त्याच्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. राउलचा उद्योग केवळ एआय आधारित साधने तयार करण्यापुरता मर्यादित नाही. ‘थिंकक्राफ्ट अकादमी’च्या माध्यमातून विद्यार्थी, व्यावसायिक तसेच विविध संस्थांमध्ये काम करणाऱया व्यक्तींना एआयचे प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास पाच लाख विद्यार्थी आणि शिकणाऱयांपर्यंत एआय प्रशिक्षण पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.
राउलच्या कामाची दखल भारताबाहेरही घेतली जात आहे. 2026 मध्ये झालेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये त्याने सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्याशी संवाद साधण्याची संधीही त्याला मिळाली.
राउलची ही कहाणी केवळ एआय किंवा उद्योगविश्वापुरती मर्यादित नाही. त्याचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा संदेश देतो तो म्हणजे, मोठे स्वप्न पाहण्यासाठी मोठे वय असण्याची गरज नाही. जिज्ञासा, स्वयंअध्ययन, मेहनत, प्रयोग करण्याची तयारी आणि योग्य संधी मिळाल्यास शाळेत शिकणारा विद्यार्थीही तंत्रज्ञानाच्या जगात स्वतची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. तसेच एआय क्षेत्रात काम करण्यासाठी केवळ अभियांत्रिकी किंवा संगणकशास्त्राचे शिक्षणच आवश्यक आहे असेही नाही. विविध शैक्षणिक शाखांमधील विद्यार्थी आपल्या आवडी, कौशल्ये आणि कल्पकतेच्या जोरावर या नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.

























































