अभिप्राय – नवता जपणारा कथासंग्रह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माधव गवाणकर

प्रणव सखदेव, महावीर जोंधळे, ह. शि. खरात. पंकज कुरुलकर, राहुल शिंदे अशा  प्रसिद्ध व नवोदित लेखक, कथाकारांना स्थान देणारा, ‘पुरुष उवाच’ या पुण्यातील वैशिष्टय़पूर्ण दिवाळी विशेषांकातील निवडक कथांचा समावेश असलेला ‘नात्यातला भूलभुलैया’ हा कथासंग्रह वाचकांना आवडणारा आहे.

बदलत्या जीवनातील ताणतणाव, भावनिक गुंता सहजतेने टिपण्याचे कौशल्य या कथाकाराकडे आहे. जीवघेण्या दारिद्रय़ापासून ते एल.जी.बी.टी. सुमदायाच्या उपेक्षेपर्यंत अनेकविध विषय, जे प्रत्यक्षात अनुभवले जातात. इथे शब्दरूपात आले आहेत. त्यात मोकळेपणा आणि दुनियादारीची सूक्ष्म समज आहे. यामुळे हे कथालेखन उथळ होत नाही आणि नेहमीचे ‘साचे’ मोडले जातात. या कथांची बैठक स्त्री-पुरुष समानता आणि कोणत्याही प्रकारच्या लिंगभावाचा स्वीकार करणाऱ्या चळवळीने तयार केलेली आहे. त्यामुळे लेखनाला खास समाजभान आहे. केवळ भावभावनांची उधळण नाही. शोषण, विषमता या विरोधात उभी राहणारी स्त्रीवादी विचारसरणी संपादिका डॉ. गीताली वि. म. यांच्याकडे असल्यामुळे कथांची निवड त्यादृष्टीने झाली आहे.

‘पुरुषीपणा’कडून ‘माणूसपणा’कडे होणारा प्रवास सोपा नाही. त्यात आत्मसंघर्ष असतो व त्या दृष्टीनेही या संग्रहाकडे बघता येईल. कथांच्या मुळाशी असलेली वैचारिक जाणीवच या कथालेखनाला बळ देणारी ठरली आहे. स्त्री-पुरुष नात्याचे पारंपरिक पदर या लेखनात पूर्णपणे टाळले आहेत असेही नाही. मिलिंद बोकील यांच्या कथेतील स्त्राr-पुरुष संबंधांच्या, समतेच्या संदर्भातील सखोल जाणीव मनात ठसते. एकूणच, स्त्री-पुरुष नात्याचा पुनर्विचार करण्याचा काळ आलेला आहे व त्यादृष्टीने अशी पुस्तके मनाला नवी दिशा देतील. सध्याच्या लैंगिक विषमतेच्या विरोधात सर्वांनीच संघर्षशील व्हायला हवे हे एकूणच अशी पुस्तके मनावर बिंबवतात व त्यादृष्टीने कृत्रिमता टाळणारे उघडेनागडे वास्तवही सौम्य भाषेत रंगवतात.

दीनानाथ मनोहर यांची ‘एक मॅरेथॉन स्पर्धा’ ही कथा वाचकांच्या अधिक लक्षात राहणारी ठरेल. स्पर्धेत माणूसपणाची होणारी पायमल्ली ते वाचकांसमोर आणतात. पुरुषी अहंकारातून संसारात शिरणारा विषारी संशय व त्यामुळे दूषित होणारे सहजीवन हा विषय एकूणच समाज जीवनात काही धोके निर्माण करीत आहे. त्यादृष्टीने प्रदीप आवटेची कथा वाचनीय ठरते. कथेपेक्षा ती व्यथा आहे. ‘आमच्या पिढीला व्हर्जीन बायको मिळणे ऑलमोस्ट दुरापास्त आहे,’ अशी दचकवणारी वाक्येही त्यात आहेत. पुरुषांच्या मनातील असुरक्षितता, न्यूनगंड व एकूणच लैंगिक संबंधातील पुरुषाच्या ‘मर्यादा’ अशा कथात्मक मनोगतातून सुचवल्या जातात. (अपत्यप्राप्तीसाठीच्या लैंगिक संबंधेत ‘पुरुष’ प्राण्याला काही स्पेस न राहणे असेही भविष्यात घडेल. तशीही एखादी कथा तरुण लेखकाने लिहावी.) ‘हिरवा फणा’ ही कथा ललित लेखाकडे झुकलेली असून कोवळय़ा वयातील अंधविश्वास, भय आणि बुद्धिवादाचा अचानक मिळणारा आधार याचे चित्रण निरागसपणे करणारी आहे. ‘डेटिंग साइट’चा संदर्भ असलेली ‘शोध’ ही राहुल शिंदेंची कथा खऱया अर्थाने ‘आजची कथा’ वाटते. ‘तिशी गाठली, तरी मनाने कोणाशी नाते तयार होत नाही’ हे आजच्या तरुणीचे वैफल्य काहीसे प्रातिनिधिक वाटते. ‘रात गयी, बात गयी’ ही वृत्ती तरुण पिढीमध्ये वाढली, तरी शेवटी त्यात विफलताच आहे हे शिंदे यांनी मोजक्या शब्दांत मांडले आहे.

एकूणच, सर्वच कथा अगदी मनमोहक नसल्या तरी, वेगळेपणाचे सामर्थ्य जपणाऱया आणि ‘विचारशील’ वाटतात. तेच या कथा लेखनाचे यश आहे. दिवाळी विशेषांकातील मराठी कथांना पुस्तक मूल्य असते हे या संग्रहाच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे.

नात्यातला भूलभुलैया

संपादन : डॉ. गीताली वि. मं.

प्रकाशक : अमित प्रकाशन, पुणे

पृष्ठे : 239

मूल्य : 480/-