
>> दिव्या सौदागर
[email protected]
आयुष्याच्या किंवा करिअरच्या एखाद्या टप्प्यावर घेतलेल्या निर्णयाबाबत, वर्तमान व भविष्याबाबत अस्थिरता वाटू लागते. मानसिक गोंधळ जाणवतो. भूतकाळातील कठीण काळाचा, आघातांचा त्याला संदर्भ असतो. यातून बाहेर पडायचे तर स्वतच्या चुकांची जबाबदारी घेत स्वतला सामाजिक मनोविकासाच्या टप्प्यावर पूर्ण स्वातंत्र्य देणे. यासाठी समुपदेशन घेणे निश्चितच योग्य ठरते. अनुयाची कहाणी हेच सांगते.
अनुयाची (नाव बदलले आहे) ही तिसरी नोकरी होती आणि आताही तीन महिन्यांत ती कंटाळली होती. रोज त्याच प्रकारची कामं करून तिला कंटाळा आला होता. `माझ्या आधीच्या नोकऱयांमध्येही ही परिस्थिती होती म्हणून मी हा जॉब घेतला. पण इथेही सेम वर्क. आताही मला या जॉबचा कंटाळा आला आहे. फक्त पगार चांगला आहे म्हणून मी हा जॉब रेटलाय. असे वाटते की पगार कमी असला तरी चालेल, पण मनासारखे काम मिळाले पाहिजे.’ अनुया बोलतच होती. तिच्या बोलण्यावरून आणि हावभावांवरून ती कमालीची कंटाळली आहे हे जाणवत होतं.
‘मानसिक समाधान देणारी नोकरी पकडायची’ या एकाच विचाराने तिची झोप उडाली होती. नेहमी आनंदी असणारी अनुया आता चिडचिडी झाली होती. छोटय़ा गोष्टींवरून ती बराच वेळ नाराज राहत होती. घरच्यांशी बोलणं तिने कमी केलं होतंच शिवाय तिच्या खाण्यापिण्यावरही परिणाम झालेला जाणवत होता. थोडय़ा विषादाने अनुया म्हणाली. `खरं सांगू का? मला माझं करीअर स्विच करावंसं वाटतंय’, काहीशा गंभीरपणे बोलत तिने स्वतची खरी समस्या उलगडून सांगायला सुरुवात केली.
अनुया ही आता पस्तिशी पार केलेली अविवाहित महिला होती. आई आणि ती अशा दोघीच एकमेकींना होत्या. अनुयाचं बालपण हे नकारात्मक वातावरणात करपून गेलं होतं. कारण; तिचे वडील हे अत्यंत विक्षिप्त, संशयी स्वभावाचे होते. त्यांनी तिच्यावर भरपूर निर्बंध आणले होते. त्यामुळेच तिने तिच्या मनाविरुद्ध वाणिज्य शाखेतून शिक्षण पूर्ण केले होते आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच नोकरी पकडली होती. अचानक त्यांचे निधन झाले तेव्हा अनुया नुकतीच नोकरीला लागली होती. मग घराचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी तिने मनाविरुद्ध नोकरी सुरू ठेवली. त्यात वडिलांच्या वागण्याचा, बोलण्याचा मानसिक आघात तिच्यावर इतका होता की त्यांच्यानंतरही तिला स्वतला त्यातून बाहेर यायला वेळ लागला. त्यामुळे तिने `मानसिक आघात समुपदेशन’ (ट्रॉमा कॉउन्सलिंग) आणि `व्यवसाय विषयक मार्गदर्शन’ करण्याचं ठरवलं.
`पण मला आता क्षमता चाचणी (aज्tग्tल्dा tाst ) केल्याने फायदा होईल का? आता माझी चाळिशी येईलही. करीअर तर मला माझ्या आवडीचं घ्यायचंय. पण मी हे सगळं झेपवू शकेन ना? तसंच दुसरं म्हणजे मी अजूनही अविवाहित आहे. आता कुठे मी जोडीदार बघायला सुरू केलंय. आताही मी ज्या मुलांना भेटले त्यावेळी मला स्वतविषयी, करीअरविषयी झालेला गोंधळ माझ्या बोलण्यातून त्यांना स्पष्ट जाणवला. आता मला एवढं तरी या सत्रांमधून कळलं आहे की भूतकाळातल्या अप्रिय आणि आघात देणाऱया घटनांवर कसं काम करायचं. म्हणूनच मला आता नवीन आयुष्य स्टार्ट करायचंय. मला मनासारखं करीअर, मनासारखा व्यवसाय आणि समाधान हे मिळवायचंय. यासाठीच मला मदत करा’ अनुयाची कळकळ तिच्या अंतर्गत प्रेरणेची ग्वाही देत होती. तसंच तिचे प्रश्न तिच्या परिपक्वतेची ओळख करून देत होते. तिला सतावणारे हे प्रश्न तिच्या वयाचा विचार करता साहजिकच होते.
मानसशास्त्राrय अंगाने अनुयाच्या केसचा विचार करता तिचे भावनिक आणि सामाजिक द्वंद्व भरपूर जाणवले. लहानपणापासून आलेल्या वडिलाच्या दडपणामुळे तिचे व्यक्तिमत्त्व हे खुरटलं होतं. स्वतची आवड, निवड, विकास या बाबतीत तिने कधी पावलं उचलली नाहीत. मात्र वडिलांच्या जाण्याने एक मुक्तता तिला मिळाली. तेव्हा तिला स्वत्वाची जाणीव होऊ लागली आणि तिथे तिचा मानसिक संघर्ष सुरू झाला. एरीक एरिक्सन या प्रसिद्ध मानशास्त्रज्ञ आणि मनोविश्लेषणतज्ञ यांच्या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या टप्प्यांमध्ये मध्यवर्ती संघर्ष असतोच.
साधारण पस्तिशीच्या दरम्यान व्यक्ती भावनिक आणि सामाजिक परिपक्वतेचा दिशेने प्रवास करत असते. तेव्हा गत आयुष्यातील कडू गोड आठवणींच्या शिदोरीवर तिची वाटचाल सुरू असते. म्हणूनच स्वतबद्दल पडलेले प्रश्न, नव्याने झालेली जाणीव आणि इतरांबाबत असणारी मते या टप्प्यात मुख्यत्वे व्यक्तीला जाणवतात. इथेच व्यक्ती जेव्हा स्वतच्या मर्यादा मान्य करते आणि त्याच्यावर काम करते तेव्हा तिला मानसिक स्थैर्य तसंच सामाजिक बांधिलकी प्राप्त होते.
अनुयाच्या बाबतीत हा सामाजिक मनोविकासाचा टप्पा समुपदेशनाच्या माध्यमातून सफल झाला. आता पुढचा टप्पा होता तो म्हणजे तिच्या ठरवलेल्या करीअरला योग्य ती दिशा देण्याचा. त्यासाठी अभियोग्यता चाचणी सर्वप्रथम घेण्यात आली ज्यामध्ये तिच्या आवडीनिवडीबद्दल, क्षमतेबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि ज्ञानाबद्दल कल्पना आली. त्यानुसार अनुयाला सर्जनशीलतेची क्षमता आणि त्याबद्दल गती आहे हे समजले. तिला याच उत्तराची अपेक्षा होती. कारण तिचा अहवाल सांगितल्यावर तिचा चेहरा खुलला. तिने हे कबूल केलं की तिला भरतकाम, विणकाम करायला भरपूर आवडतं. तिला याच क्षेत्रात काहीतरी करायला आवडेल.
त्यानुसार अनुया कामाला लागली. तिने तीन महिन्यांत स्वतच्या डिझाइन्स तयार केल्या, आकर्षक अशा लोकरीच्या पर्सेस, बाहुल्या आणि स्वेटर्स तयार करून ऑनलाइन पीला सुरुवात केली. आता अनुयाने स्वतचा एक ब्रँड `अनुश्री’ या नावाने तयार केलाय. त्याचं मार्केटिंग तिने उत्तम प्रकारे सुरू केलेय. या सगळ्यात तिने नोकरी धरून ठेवलीय. कारण तिला व्यवसायासाठी भांडवलाची गरज आहे. पण येत्या काळात ती पूर्णपणे या तिच्या व्यवसायात उतरणार आहे. आज तिच्या चेहऱयावरचा आनंद आणि समाधान हे भरपूर आहे. शेवटी तिचा खऱया अर्थाने विकास झाला आहे.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)


























































