
<< दुष्यंत पाटील
[email protected]
निसर्गाची दोन टोकाची, विसंगत रूपं एकत्रित दर्शवणारे हे प्रसिद्ध `द ऑक्सबो’ चित्र. अमेरिकेतल्या थॉमस कोल या चित्रकारानं निसर्गाचे हे रूप कॅनव्हासवर इतक्या जिवंत आणि नाटय़मय पद्धतीनं रंगवलं की, ते चित्र जागतिक कलाविश्वातला एक मैलाचा दगड ठरलं.
कल्पना करा, आपण पावसाळ्याच्या दिवसांत महाबळेश्वरच्या किंवा माथेरानच्या एखाद्या उत्तुंग कड्यावर उभे आहोत आणि समोर पाहत आहोत. आपल्याला डाव्या बाजूला घनदाट, काळाकुट्ट, अंगावर काटा आणणारा दाट सह्याद्रीचा रानपायथा दिसतोय; तिथे अचानक आभाळ फाटून विजा कडाडत आहेत, वाऱ्याच्या वेगानं भलीमोठी झाडं उन्मळून पडत आहेत आणि पावसाचं रौद्र तांडव सुरू आहे. पण त्याच क्षणी, आपण उजव्या बाजूला पाहिलं, तर खाली पसरलेल्या नदीच्या खोऱ्यात सोनेरी कोवळं ऊन पडलंय. तिथे शांतपणे शेती चालू आहे, धुराडय़ांतून संथ धूर निघतोय, नदी अगदी शांत संथपणे वळणे घेत वाहत आहे आणि एक आल्हाददायक प्रसन्न शांतता नांदत आहे!
एकाच वेळी एकाच जागेवरून पाहिलेली ही निसर्गाची दोन टोकाची, विसंगत रूपं. एकीकडे भयानक वादळ आणि दुसरीकडे स्वर्गीय शांतता! ही विसंगती पहिली की आपण नकळत अंतर्मुख होतो. आजपासून जवळपास दोनशे वर्षांपूर्वी, अमेरिकेतल्या थॉमस कोल नावाच्या चित्रकारानं नेमकं हेच दृश्य कॅनव्हासवर इतक्या जिवंत आणि नाट्यमय पद्धतीनं रंगवलं की, ते चित्र जागतिक कलाविश्वातला एक मैलाचा दगड ठरलं. त्या चित्राचं नाव आहे- `द ऑक्सबो.’
बालपण संघर्षात गेलेल्या कोलनं अमेरिकेमध्ये चित्रकलेमधली `हडसन रिव्हर स्कूल’ नावाची चळवळ सुरू केली. ही अमेरिकन कला इतिहासातली पहिली आणि अत्यंत महत्त्वाची चित्रकला चळवळ होती. या चळवळीमध्ये चित्रकारांनी अमेरिकेतल्या निसर्गाचं अथांग आणि नयनरम्य सौंदर्य आपल्या कॅनव्हासवर उतरवलं.
`द ऑक्सबो’ हे चित्र समजून घेण्यासाठी आपल्याला 1830 च्या दशकातली अमेरिका समजून घ्यावी लागेल. या काळात अमेरिका अत्यंत झपाट्यानं बदलत होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांच्या नेतृत्वाखाली देशात भांडवलशाही आणि विकासाची एक अभूतपूर्व लाट आली होती. त्यांची विकासाची विचारसरणी सरळ होती – `या संपूर्ण खंडातली जंगलं तोडणं, इथल्या मूळ रहिवाशांना (रेड इंडियन्स) हुसकावून लावणं, नद्या अडवणं, खाणी खोदणं आणि निसर्गावर विजय मिळवून तिथे कारखाने व शहरं वसवणं हा आमचा दैवी अधिकार आहे!’ या काळात तिथले लोक कुऱ्हाडी घेऊन जंगलांवर तुटून पडत होते. रेल्वेच्या रुळांचं जाळं पसरत होते. जंगलं साफ करून तिथे शेतं आणि शहरं उभी राहत होती.
त्या दिवसांत कोल एका श्रीमंत व्यक्तीसाठी एक चित्रमालिका रंगवत होता. या चित्रमालिकेत त्याला एका साम्राज्याचा जन्म, त्याचा विकास, त्याचं ऐश्वर्य, त्याचा विनाश आणि शेवटी स्मशानशांतता असं मानवी इतिहासाचं चक्र दाखवायचं होतं. हे काम त्याच्यासाठी अतिशय मानसिक ताणाचं आणि थकवणारं होतं. सलग महिनोन्-महिने बंद खोलीत बसून युद्धाची, विनाशाची आणि आगीची चित्रं काढताना कोल मानसिकदृष्ट्या खचला होता. याच वेळी न्यूयॉर्कमधलं वार्षिक कला प्रदर्शन जवळ आलं होतं. त्यामध्ये कोलवर काहीतरी नवीन आणि भव्य चित्र देण्यासाठी दबाव होता. कोलनं ठरवलं की, या काल्पनिक ऐतिहासिक चित्रांमधून थोडं बाहेर पडायचं आणि त्याला मनापासून आवडणारा अमेरिकेचा खराखुरा निसर्ग पुन्हा एकदा मोठ्या कॅनव्हासवर मांडायचा! यामधूनच `द ऑक्सबो’ चित्राची निर्मिती झाली. `द ऑक्सबो’ चित्रात निसर्गाची दोन रूपं दिसतात. उजवीकडे मुसळधार पाऊस, जंगल, पर्वत दिसतंय. उजव्या टोकाला दूरचे डोंगर, त्यावर कोसळणारा पाऊस आणि चमकणारी वीज दिसतीये. याउलट उजवीकडे वादळाचा लवलेशही नाही. आकाशात ढगांमधून बाहेर आलेले कोवळं ऊन पसरलंय. खाली नदीनं जमिनीवर एक सुरेख, अर्धगोलाकार वळसा (Oxbow) घेतलाय. चित्रात कोलनं स्वत:ला कॅनव्हास आणि कुंचला घेऊन दाखवलंय. पुढच्या भागात दिसणारं वीज कोसळलेलं, मोडकळीस आलेलं झाड मानवी नश्वरतेचे आणि निसर्गाच्या रौद्र रूपाचं प्रतीक आहे.
या चित्रातली सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे पार्श्वभूमीतील डोंगरावर लपलेला संदेश. जर या डोंगराकडे सामान्य नजरेनं पाहिलं, तर हिब्रू लिपीत तिथे `नोआ’ हा शब्द कोरलेला दिसतो. नोहा म्हणजे बायबलमधला, महाप्रलयाच्या वेळी सर्व प्राण्यांना आपल्या नौकेत बसवून वाचवणारा प्रेषित. पण हेच चित्र उलटं करून बघतलं तर ती अक्षरे (अल-शद्दाई म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर) अशी दिसतात. हे चित्र पाहणाऱ्याला एक अतिशय ज्वलंत प्रश्न विचारतं: मानवाचा हा तथाकथित विकास निसर्गाच्या कुशीत शांतपणे नांदणार आहे, की निसर्गाला पूर्णपणे गिळंकृत करणार आहे? डाव्या बाजूचं वादळ हे जणू काही निसर्गाचा संताप व्यक्त करतंय. ते वादळ उजव्या बाजूच्या मानवी वसाहतींवर चाल करून जाणार आहे, की हळूहळू नाहीसं होणार आहे? याचं उत्तर कोलनं प्रेक्षकांवर सोपवलंय.
दोनशे वर्षं झाली असली तरी कोलनं कॅनव्हासवर मांडलेला प्रश्न आजही तसाच आहे!























































