
शांत आणि निसर्गरम्य देवरूख शहरात सध्या वन्यजीवांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच शहरात रानगव्याचे दर्शन झाले असताना, आता थेट मध्यवर्ती भागात बिबट्याने हजेरी लावल्याने खळबळ उडाली आहे. रात्री देवरूख हायस्कूलच्या अगदी समोरील रस्त्यावर बिबट्या मुक्तपणे वावरताना दिसून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास देवरूख हायस्कूलसमोरील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या काही प्रत्यक्षदर्शींना बिबट्याचे दर्शन झाले. शाळा आणि महाविद्यालयीन परिसर असलेला हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. अशा मुख्य ठिकाणीच बिबट्या आल्याचे समजताच परिसरात भीतीचे सावट पसरले. गेल्या काही दिवसांपासून देवरूख आणि आसपासच्या ग्रामीण भागांत रानगव्याच्या वावरामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त होते. रानगव्यानंतर आता थेट शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
रात्रीच्या वेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी आणि पादचाऱ्यांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये आणि शाळा प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात तातडीने गस्त वाढवावी, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करावी आणि बिबट्याचा वावर रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी देवरूखकर नागरिकांकडून केली जात आहे.























































