
हिंदुस्थाननी खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी पदकांची लयलूट केली. रविवारी हिंदुस्थानच्या खात्यात एपूण सात पदकांची भर पडली असून, त्यापैकी तब्बल पाच पदके अॅथलेटिक्समधून आली. अन्सी सोजनने लांब उडीत रौप्यपदकाची झेप घेतली, सर्वेश कुशारेने उंच उडीत रुपेरी भरारी मारली, तर तेजस्विन शंकरने डेकाथलॉनमध्ये कांस्यपदक पटकावले. याचबरोबर हरिता भद्राने 200 मीटरमध्ये आणि पारुल चौधरीने 3,000 मीटर स्टीपलचेजमध्ये कांस्यपदकाची कमाई करत हिंदुस्थानी अॅथलेटिक्सचा दबदबा कायम राखला. अंसीचे सुवर्ण अवघ्या दोन सेंटीमीटरने हुकले, तर पावसातही सर्वेशने 2.25 मीटरची उंची पार करत रुपेरी झेप घेतली. तेजस्विनने सलग दुसऱ्या आशियाई स्पर्धेत पदक जिंकत सातत्याची मोहोर उमटवली. विशेष म्हणजे, एकाच दिवशी अॅथलेटिक्समध्ये पाच पदकांची कमाई करत हिंदुस्थानी खेळाडूंनी ट्रक अॅण्ड फिल्डवर आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.
अन्सी सोजनला लांब उडीमध्ये रौप्य
हिंदुस्थानच्या अन्सी सोजनने महिलांच्या लांब उडीमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. अन्सीने 6.53 मीटरची झेप घेत सुवर्णपदकावर दावा ठोकला होता, मात्र चीनच्या हुआंग यिंगयिंगने अखेरच्या प्रयत्नांत 6.55 मीटरची उडी मारत अंसीच्या हातातून सुवर्ण अक्षरशः हिसकावून घेतले. अवघ्या दोन सेंटीमीटरच्या फरकाने अन्सीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या लांब उडीमध्ये हिंदुस्थानला यापूर्वी 2002 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यामुळे अंसीच्या कामगिरीने या क्रीडा प्रकारात हिंदुस्थानची पुन्हा एकदा दमदार उपस्थिती अधोरेखित केली आहे.
सर्वेशच्या उंच उडीला रुपेरी झळाळी
पावसाचा मारा सुरू असतानाही हिंदुस्थानच्या सर्वेश कुशारेने पुरुषांच्या उंच उडीमध्ये रौप्यपदकावर झडप घातली. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार करत पदक निश्चित केले, मात्र त्याचे सुवर्णपदक अवघ्या एका प्रयत्नाने हुकले. चीन तैपेईच्या चाओ शुआन-फूने 2.25 मीटरची उंची पहिल्याच प्रयत्नात पार केली आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. सर्वेशने हीच उंची दुसऱ्या प्रयत्नात पार केली. अंतिम फेरीतील बहुतांश वेळ सर्वेश आघाडीवर होता, मात्र निर्णायक टप्प्यात किरकोळ फरकाने त्याला सुवर्णापासून दूर राहावे लागले. पावसाच्या परिस्थितीतही सर्वेशने दाखवलेली झेप हिंदुस्थानसाठी रौप्यपदकाची शान ठरली.
तेजस्विनला सलग दुसऱ्या स्पर्धेत पदक
पुरुषांच्या डेकाथलॉनमध्ये हिंदुस्थानच्या तेजस्विन शंकरने 7,934 गुणांसह कांस्यपदक पटकावले. तब्बल दोन दिवस आणि दहा स्पर्धांमध्ये रंगलेल्या या संघर्षात तेजस्विनने अखेरच्या 1500 मीटर शर्यतीत 4 मिनिटे 33.09 सेपंदांची वेळ नोंदवत सर्वोत्तम कामगिरी केली आणि कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. जपानच्या मरुयामाने 8,123 गुणांसह सुवर्ण, तर चीनच्या चेनने 8,012 गुणांसह रौप्यपदक जिंकले. तेजस्विनने 7,934 गुणांसह कांस्यपदक मिळवले. विशेष म्हणजे, तेजस्विनचे हे सलग दुसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक ठरले. हांगझोऊ येथे त्याने रौप्यपदक जिंकले होते.
पारुलची स्टीपलचेजमध्ये कांस्य झेप
महिलांच्या 3,000 मीटर स्टीपलचेजमध्ये हिंदुस्थानच्या पारुल चौधरीने कांस्यपदकाची कमाई केली. पारुलने 9 मिनिटे 08.67 सेपंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत ही पदकविजयी कामगिरी केली. पारुलच्या दमदार धावण्याने हिंदुस्थानच्या अॅथलेटिक्स खात्यात आणखी एका पदकाची भर पडली.
अंकिताचे पदक हुकले
पारुलसोबत स्टीपलचेसमध्ये धावणाऱ्या अंकिता ध्यानीने 9ः19.24 सेपंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली. ती चौथी आली. म्हणजे पदकापासून ती थोडक्यात दूर राहिली, पण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने स्वतःची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
हरिताचा वेग; कांस्यवेध!
हरिता भद्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदकावर झडप घातली. 23 वर्षीय हरिताने अंतिम फेरीत आक्रमक धाव घेतअखेरच्या टप्प्यात वेगाचा जोरदार धडाका लावत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत कांस्यपदक जिंकले. तिची ही कामगिरी हिंदुस्थानी अॅथलेटिक्ससाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. आशियाई स्पर्धेत तिने आपल्या वेगाची ताकद दाखवत हिंदुस्थानच्या पदकतालिकेत आणखी एका कांस्यपदकाची भर घातली. दरम्यान, याच शर्यतीच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानची उन्नती अयप्पा बोलंड हिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.






















































