
हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने सिंगापूरचा 7-0 गोल फरकाने धुव्वा उडवत आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘ब’ गटात सलग पाचव्या विजयासह उपांत्य फेरीत धडक दिली. आता 30 सप्टेंबरला ते कोरियाशी दोन हात करणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेता चीन यजमान जपानशी भिडणार आहे.
कर्णधार सलीमा टेटेने 17 व्या मिनिटाला हिंदुस्थानचे खाते उघडले. त्यानंतर सुनेलिता टोप्पोने 22 व्या आणि 24 व्या मिनिटाला सलग दोन गोल करत हिंदुस्थानची आघाडी 3-0 वर नेली. लालरेमसियामीने 26 व्या, तर ऋतुजा दादासो पिसलने 29 व्या मिनिटाला गोल करत मध्यंतरापूर्वीच हिंदुस्थानची पकड मजबूत केली. तिसऱ्या सत्रात निकी प्रधानने 35 व्या मिनिटाला सहावा गोल केला. सामना संपण्यास अवघी पाच मिनिटे बाकी असताना दीपिकाने पेनल्टी का@र्नरवर अप्रतिम फ्लिक मारत सातवा गोल नोंदविला. हिंदुस्थानने सामन्यावर अखेरपर्यंत वर्चस्व राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.
























































