
महाड औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) सिनर्जी केम इंडस्ट्रीज या कंपनीत रविवारी रात्री उशिरा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की कंपनीच्या परिसरापासून सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत हादरे बसले. हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही मात्र या दुर्घटनेत काही कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले.
सिनर्जी इंडस्ट्रीत रविवारी रात्री उशिरा अचानक भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर कंपनीच्या परिसरात मोठया ज्वाला भडकल्या. धुराचे लोट दूरवरून दिसत होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटामध्ये काहीजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून जखमींची संख्या आणि त्यांची प्रकृती याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडया तसेच रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.






















































