
साताऱ्याचा साहिल जाधव सध्या महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील हजारो तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणारा चेहरा ठरतोय. पठ्ठ्याने खडतर संघर्षाचा सामना करत समोर येणाऱ्या असंख्य अडचणींच्या छाताडावर पाय ठेवत हिंदुस्थानासाठी एक नव्हे तर दोन सुवर्णपदकांची कमाई केली. एक सुवर्णपदक कम्पाऊंड मिश्र सांघिक प्रकारात आणि दुसरं सुवर्णपदक कम्पाऊंड पुरुष सांघिक प्रकारात जिंकलं. साहिल जाधवच्या या कामगिरीमुळे त्याच्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावली असून त्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाचं सोनं झालं आहे.
साहिलचा सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. असंख्य अडचणी, संघर्ष आणि गरिबी सारख्या खडतर टप्प्यांमधून पुढे जात त्याच्या संघर्षाची ज्योत पेटलीये. या संघर्षमय प्रवासात त्याच्या आई-वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याच्या स्वप्नांना बळ मिळालं. कोरोना महामारीच्या काळात वडील राजेश जाधव यांची नोकरी गेली. घरात आई शिक्षक होती, मात्र मिळणारा पगार अगदीच तुटपुंजा होता. अशा परिस्थितही आई-वडिलांनी मुलाच्या स्वप्नाला प्रथम प्राधान्य देत आपला संघर्ष सुरू ठेवला, पण हार मानली नाही. जुन्या आणि वाकलेल्या बाणांनी लेक सराव करतोय, हे पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी यायचं. पण लेकाची हिच जिद्द आई-वडिलांनी हेरली आणि त्याच्या स्वप्नांसाठी आपल्या संघर्षाची धार आणखी मजबूत केली.
संघर्षाचे दिवस सुरू होते. त्याच दरम्यान काही महिन्यांनंतर वडिलांना दुसऱ्या गावात खूप कमी पगाराची नोकरी मिळाली. वडिलांच्या नोकरीमुळे कुटुंबाला थोडा आधार मिळाला. साहिलला आंतरराष्ट्रीय दर्जाचे धनुष्यबाण खरेदी करण्यासाठी पैशांची गरज होती. घरातील बेताची परिस्थिती आणि मुलाचे करिअर, अशा कात्रीत सापडलेल्या आईने क्षणाचाही विचार न करता स्वतःचे अंगावरील सोने गहाण ठेवले. त्या दागिन्यांच्या मोबदल्यात आलेल्या पैशातून घेतलेल्या धनुष्यबाणाने आज साहिलने जपानच्या भूमीवर हिंदुस्थानसाठी सुवर्णपदक जिंकले आहे. आईच्या त्या कष्टाचं आणि गहाण ठेवलेल्या सोन्याचं खऱ्या अर्थाने ‘सुवर्णपदकात’ रूपांतर करत लेकाने आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
लग्नाचे वय झालेल्या साहिलला जेव्हा कुटुंबीयांनी स्थळाविषयी विचारले, तेव्हा त्याने दिलेले उत्तर त्याच्या खेळावरील निस्सीम प्रेमाची साक्ष देणारे होते. “माझं लग्न आर्चरीशी (तिरंदाजी) झालेलं आहे,” असे म्हणत त्याने आपले संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त खेळावर केंद्रित केले. काल ड्युटीवर असल्यामुळे वडिलांना टीव्हीवर सामना पाहता आला नाही, त्यांनी मोबाईलवरच लेकाची कामगिरी पाहिली. विजयानंतर वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “तू हळूहळू एक एक पायरी चढून वरपर्यंत पोहोच, जेव्हा वर पोहोचशील तेव्हा मागे वळून पाहू नको,” हा वडिलांचा सल्ला साहिलने अक्षरशः खरा ठरवला. ABP माझाशी बोलताना वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यापूर्वीही 2025 च्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत साहिलने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावून आपली ओळख निर्माण केली होती. आता आशियाई खेळांसारख्या महामंचावर सांघिक सुवर्णपदक जिंकत त्याने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. साताऱ्याच्या या सुवर्णपुत्राने घेतलेली झेप आणि त्याच्या पाठीशी उभे राहिलेले त्याचे आई-वडील, ही कहाणी आज संपूर्ण देशासाठी एका प्रेरणादायी चित्रपटासारखी ठरत आहे.























































