
दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात बुधवारी धक्कादायक घटना घडली. विमान तब्बल 34 हजार फूट उंचीवर असताना सह-पायलटने कॅप्टनवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला कॅप्टन हिंदुस्थानी वंशाचा असून त्याचे नाव स्मित मछार असल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतरही त्यांनी विमानावरील नियंत्रण कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. विमानात सुमारे 180 प्रवासी होते. ही घटना घडली तेव्हा विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जात होते. सह-पायलटने कॅप्टनवर चाकूने वार केल्यानंतर विमानाची उंची अचानक कमी झाली. अवघ्या काही मिनिटांत विमान 34 हजार फुटांवरून सुमारे 17 हजार फुटांपर्यंत खाली आले. विमानाचा वेगही मोठ्या प्रमाणात वाढला.
या घटनेनंतर विमानाने आंतरराष्ट्रीय आपत्कालीन संकेत 7700 पाठवला. त्यानंतर काही वेळाने 7500 हा हायजॅकचा संकेत देणारा कोडही वापरण्यात आला. विमानाने जॉर्डनच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि नंतर सौदी अरेबियाच्या दिशेने वळवण्यात आले. अखेर सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
स्मित मछार हे अनुभवी वैमानिक आहेत. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, जून 2022 पासून ते फ्लायदुबईच्या बोईंग 737 विमानांच्या ताफ्यात कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबईतील स्पाईसजेटमध्ये सुमारे 11 वर्षे काम केले. स्पाईसजेटमध्ये पायलट-इन-कमांड म्हणून त्यांनी 6 हजार 400 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव घेतला आहे. नोव्हेंबर 2020 पासून ते लाइन ट्रेनिंग कॅप्टन म्हणून इतर वैमानिकांना प्रशिक्षणही देत होते. फ्लायदुबईमध्ये ते ‘डायरेक्ट-एंट्री कॅप्टन’ म्हणून दाखल झाले. त्यांना बोईंग 737 -800 तसेच 737 मॅक्स 8 आणि मॅक्स 9 विमानांवर सुमारे 9 हजार 750 तासांचा उड्डाणाचा अनुभव असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, विमानाने दुबईहून उड्डाण केल्यानंतर सुमारे 34 हजार फूट उंची गाठली होती. मात्र उड्डाणानंतर सुमारे दोन तास 15 मिनिटांनी विमान अचानक वेगाने खाली येऊ लागले. एका मिनिटापेक्षा कमी वेळात ते सुमारे 17 हजार फुटांपर्यंत खाली आले. यानंतर विमान पुन्हा काही काळ वर गेले आणि सुमारे 21 हजार 725 फूट उंची गाठली. मात्र त्यानंतर पुन्हा त्याची उंची झपाट्याने कमी झाली. विमान सुमारे 15 हजार फुटांच्या आसपास फिरत राहिले. दरम्यान, विमानाने प्रथम 7700 हा आपत्कालीन कोड आणि नंतर 7500 हा हायजॅकचा संकेत देणारा कोड प्रसारित केला. अखेर तबूक विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या घटनेत कॅप्टन स्मित मछार गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. सह-पायलटला सौदी अरेबियात अटक करण्यात आली आहे.
























































