
चेंबूर आणि गोवंडी दरम्यान रेल्वे रूळावर एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. ओळख पटविण्यासाठी मृतदेहाजवळ ठोस असे काहीच नव्हते. कपडय़ांमध्ये दोन लोकलची तिकिटे आणि होंडा लिहिलेली एक चावी सापडली होती. त्या चावीच्या आधारे एलटीटी पोलिसांनी कसून तपास करत त्या मृत तरुणाची ओळख पटविण्यात अखेर यश मिळवले.
19 जुलैच्या संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास चेंबूर- गोवंडी स्थानकादरम्यान रुळावर एका तरुणाचा दोन तुकडे झालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या कपडय़ांची झडती घेतली असता खांदेश्वर ते शिवडी अशी लोकलची दोन तिकिटे आणि एक दुचाकीची चावी मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जब्बार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल शिंदे, धर्मेंद्र आडगे या अंमलदारांनी खांदेश्वर, चेंबूर स्थानकात जाऊन सीसीटीव्ही तपासले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यानंतर पोलिसांनी घाटकोपर, चेंबूर आणि शीव येथील होंडा दुचाकीच्या शोरूममधून 2020 पासून खरेदी केलेल्या दुचाकी मालकांची माहिती घेतली. जवळपास 700 दुचाकी मालकांना संपर्क साधल्यानंतर पोलिसांना यश आले.


























































