
शीव येथील प्रतीक्षा नगर म्हाडा वसाहतीचा समूह पुनर्विकास स्वतःच करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. ईपीसी कंत्राटदाराची नेमणूक करून म्हाडा हा पुनर्विकास करण्याच्या तयारीत आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच गृहनिर्माण विभागाला मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
म्हाडा वसाहतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. अभ्युदय नगर, मोतीलाल नगर, कामाठीपुराच्या धर्तीवर आता प्रतीक्षा नगर वसाहतीचा समूह पुनर्विकास करण्याची योजना म्हाडाने आखली आहे. सुमारे २५ हेक्टर जागेवर वसलेल्या प्रतीक्षा नगर येथील म्हाडा वसाहतीत सद्यस्थितीत २१६ इमारती असून त्यामध्ये जवळपास १० हजार घरे आहेत. त्यापैकी ९० म्हाडाची संक्रमण शिबिरे आहेत. प्रतीक्षा नगरचा समूह पुनर्विकास ‘बांधकाम आणि विकास संस्था’ (सी अँड डी) नेमून करायचा की कंत्राटदार नेमून करायचा, याबाबत म्हाडाची चाचपणी सुरू होती. अखेर कंत्राटदाराची नेमणूक करून स्वतःच पुनर्विकास करण्याची म्हाडाची योजना आहे. पुनर्विकासात म्हाडाच्या संक्रमण शिबिरांच्या इमारतींसह ३० वर्षे जुन्या इमारतींचा समावेश केला जाणार आहे. म्हाडा याबाबतचा प्रस्ताव लवकरच गृहनिर्माण विभागाला पाठवणार असून मंजुरी मिळताच पुनर्विकासाच्या दृष्टीने पावले उचलली जातील.
प्रतीक्षा नगरमधील संक्रमण शिबिरात जवळपास साडेपाच हजार रहिवासी वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील घुसखोरांचा प्रश्न प्रलंबित आहे. संक्रमण शिबिरातील मूळ भाडेकरूंना पुनर्विकासाअंतर्गत घरे दिली जाणार आहेत. मात्र, जे घुसखोर आहेत त्यांनाही न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत संक्रमण सदनिका दिल्या जातील. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.





















































