
मनमानी कारभारामुळे निवडणूक आयोगाविषयी देशभर प्रक्षोभाचे वातावरण असताना आता विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या यादीत मतदाराच्या नावाची ‘प्रशांत बोंबले’ ऐवजी चक्क ‘प्रशांत दादासाहेबाची बॉम्बस्फोट’ अशी नोंद झाल्याचे उघडकीस आल्यामुळे यंत्रणेच्या बेछूट कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत.
सातारा जिndह्यातील मतदारांच्या नावासंदर्भात ही गंभीर चूक घडली असून, यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱयांनी म्हटले आहे. विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या जागांसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी नोंद झालेल्या मतदारांच्या यादीत हा घोळ समोर आला आहे. इंग्रजीचे मराठीत भाषांतर करताना ही अक्षम्य चूक झाली आहे. सातारा जिह्यातील वाईमधील प्रशांत दादासाहेब बोंबले यांच्या नावाची नोंद ‘प्रशांतदादा साहेबाची बॉम्बस्फोट,’ अशी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे निवडणूक विभागाच्या बेछूट कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. या संदर्भात खुद्द प्रशांत बोंबले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
दरम्यान, यासाठी जे संबंधित जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी म्हटले आहे. मतदारयादी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध केली जाते. इंग्रजी भाषेतील यादीमध्ये प्रशांत बोंबले यांचे नाव बरोबर असून, केवळ मराठी भाषेतील नोंदीमध्ये ही चूक झाल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले. संबंधित नावाची दुरुस्ती करण्यात आली असून, अंतिम यादी 6 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.



























































