सांगली जिल्हा बँकेसाठी रेकॉर्डब्रेक 351 अर्ज, सोमवारी अर्जांची छाननी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज 147 जणांनी अर्ज दाखल केले, तर जिल्हा बँकेसाठी 21 जागांसाठी रेकॉर्डब्रेक 351 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची सोमवारी (दि. 5) छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये आजी, माजी आमदार आणि खासदारांसह दिग्गजांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत येणार असल्याचे स्पष्ट झाले.

सांगली जिल्हा बँकेसाठी 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज शेवटची मुदत असल्याने अर्ज भरण्यासाठी बँकेच्या मुख्यालयातील निवडणूक कार्यालयात उमेदवारासह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 147 जणांनी अर्ज दाखल केले.

अर्ज दाखल केलेल्यांमध्ये आमदार इद्रिस नायकवडी, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, बँकेचे संचालक महेंद्र लाड, अजितराव घोरपडे, प्रकाश जमदाडे, जि. प. माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे, दिनकर पाटील, सभापती जितेश कदम, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, बसवराज पाटील, चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, सदाशिव खाडे, सिकंदर जमादार, केदार नलवडे, उपसभापती महादेव अंकलगी, बाबासाहेब माळी, किरण लाड, समित कदम, प्रतिभा पाटील, वैभव पवार, नीलेश येसुगडे, हणमंत देशमुख यांच्यासह 147 जणांनी अर्ज दाखल केले.

जिल्हा बँकेसाठी दाखल झालेल्या अर्जांची सोमवार (दि. 5) छाननी होणार आहे. यावेळी प्रथमच मोठय़ा संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे कोण कोणाचा काटा काढणार, कुणाला रिंगणातून बाजूला व्हावे लागणार हे छाननीनंतर स्पष्ट होणार आहे.