आठव्या वेतन आयोगानंतर पेन्शन 68 हजारांपर्यंत वाढणार; 69 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन 68 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या केंद्र सरकार जवळपास 69 लाख निवृत्ती कर्मचाऱ्यांना पेन्शन देत असल्याने आठव्या वेतन आयोगाचा लाभ या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना होईल. 1 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर निवृत्त होणाऱ्यांपैकी ज्या तारखेपासून आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी अपेक्षित आहे, त्यापैकी बहुतेकांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेच्या अंतर्गत पेन्शन मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या पेन्शन पोर्टलनुसार, पेन्शन मिळवण्यासाठी पात्र सेवेचा किमान कालावधी 10 वर्षे इतका आहे. 1 जानेवारी 2006 पासून पेन्शनची गणना सेवेतील शेवटचा मूळ पगार किंवा सेवेच्या शेवटच्या 10 महिन्यांत मिळालेल्या मूळ पगाराची सरासरी यांपैकी जे अधिक फायदेशीर ठरेल त्या आधारावर केली जाते.

पेन्शनची रक्कम या दोन निकषांपैकी जे फायदेशीर असेल त्याच्या 50 टक्के इतकी असते. सातव्या वेतन आयोगांतर्गत, किमान पेन्शन दरमहा 9,000 रुपये आहे, तर कमाल मर्यादा 1,25,000 रुपये इतकी आहे. निवृत्तीवेतन हे मृत्यूच्या दिनांकापर्यंत मिळत राहते. समजा एखादा कर्मचारी 1 जानेवारी 2026 रोजी किंवा आठव्या वेतन आयोगांतर्गत निवृत्त झाल्यास त्याला 2.57 या ‘फिटमेंट फॅक्टर्स’नुसार पेन्शन मिळू शकते.