
पुढील 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवून यंदाच्या प्रलंबित कामांसह पुढील वर्षी किमान 70 किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एमएमआरडीएला दिले. शिवडी ते वरळी उड्डाणपूल 31 मे 2027 पूर्वी पूर्ण करा तसेच याशिवाय डिसेंबरपर्यंत पूर्ण होणाऱया 36 किमीच्या मेट्रो मार्गिकांची व्याप्ती 50 किलोमीटरपर्यंत नेण्यासाठी कामांना गती द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री वॉर रूमच्या बैठकीत फडणवीस यांनी आज विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. पायाभूत सुविधांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पांवरील किमान 50 टक्के काम यांत्रिकीकरणावर आधारित असावे, अशी सूचना त्यांनी बैठकीत केली. मेट्रो मार्गिका 2-ब मधील डी. एन. नगर ते चेंबूर मार्गावरील जुहू सर्कलजवळील गर्डरचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार रविवारी 12 तासांच्या विशेष रस्ता ब्लॉकचे नियोजन करावे. कामाची सद्यस्थिती बघून पुढील रस्ता ब्लॉकचा निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वाकोला जंक्शनची वाहतूककोंडी फुटणार
शिवडी ते वरळी उन्नत मार्गिकेची जोडणी 31 मे 2027 पूर्वी पूर्ण करून हा रस्ता नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करावा. कोणताही नवीन रस्ता दुसऱ्या रस्त्याला जोडताना त्या ठिकाणी वाहतूककोंडी होणार नाही, यासाठी नियोजन करावे. वाकोला जंक्शनवरील वाहतूककोंडीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तातडीने उपाय शोधावा, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक घराला नळजोडणी
छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करताना शहरात प्रत्येक घराला नळजोडणी मिळेल याची दक्षता घेण्याची सूचना फडणवीस यांनी केली. कामामध्ये विलंब तसेच पूर्णत्वाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही काम पूर्ण न होणाऱया प्रकल्पांच्या कंत्राटदारांवर काळया यादीत टाकण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.


























































