
गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमधील एका सेटला अचानक आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली. या आगीत सेट जळून खाक झाला आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.
चित्रनगरीतील प्राईम फोकस स्टुडिओमधील स्टेज 8-डी समोरील ‘पती पत्नी और पंगा-सीजन 2’ रियालिटी शोच्या तात्पुरत्या उभारलेल्या शेडला दुपारी 3.40 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग शेजारीच असलेल्या ‘हसल 5’ च्या सेटपर्यंतही पोहोचली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
निर्माते, वाहिनीवर कारवाई करा
पैसे वाचवण्यासाठी निर्माते, वाहिन्या आणि प्रॉडक्शन हाऊस अग्निसुरक्षेच्या बाबतीत तडजोड करतात. ‘पती पत्नी और पंगा’या सेटवर पुरेशी अग्निसुरक्षा नव्हती, असा आरोप ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित वाहिनी, निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


























































