8 ते 9 लाख रिक्षा, टॅक्सीचालकांना दुसऱ्या टप्प्यात मराठी शिकवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि ऍपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांना मराठी शिकवण्यासाठी ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 65 हजार 800 हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, अद्याप 8 ते 9 लाख अमराठी चालक रिक्षा, टॅक्सी आणि ऍपआधारित वाहने चालवत आहेत. त्यांना दुसऱ्या टप्प्यात मराठी शिकवली जाणार आहे. त्यांनी मुदतवाढीचा गैरफायदा घेऊ नये, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. महाराष्ट्रात राहून व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला प्रवाशांशी आत्मविश्वासाने मराठीत संवाद साधता यावा, यासाठी परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठय़क्रम अभियान’ राबविण्यात येत आहे.