आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘मुंढे पॅटर्न’चा डंका! तुकाराम मुंढेंच्या मोहिमेची ‘न्यूयॉर्क टाइम्स’कडून दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेसाठी धडक कारवाईची मोहीम राबवल्यामुळे अधिक चर्चेत आलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होऊ लागले आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीची दखल अमेरिकेतील वृत्तपत्र ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने घेतली आहे. ‘अन्नसुरक्षेचा रॉकस्टार’ म्हणून थेट पहिल्या पानावर मुंढेंची प्रशंसा केली आहे.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे धडक कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या एफडीए आयुक्त म्हणून कार्यरत राहताना त्यांनी अन्नभेसळ, अस्वच्छता याविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने घेतली आहे. संबंधित वृत्तामध्ये मुंढे यांना ‘अन्नसुरक्षेचा रॉकस्टार’ आणि ‘सेलिब्रिटी अधिकारी’ म्हटले आहे. हिंदुस्थानी नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी एका अधिकाऱ्याने प्रशासकीय व्यवस्थेत बदल घडवून आणल्याचे कौतुक ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केले आहे.