पीडितेची साक्ष निःसंदेह; बलात्काऱ्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब, हायकोर्टाने फेटाळली याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन पीडितेची साक्ष निःसंदेह असल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाने एका बलात्काऱ्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. बिस्कीट आणि ब्रेड आणायला आलेल्या या पीडितेवर नराधमाने अत्याचार केला.

अल्पवयीनवर अत्याचार केल्याप्रकरणी या आरोपीला विशेष न्यायालयाने शिक्षा ठोठावली. याविरोधात त्याने अपील याचिका दाखल केली. पोलिसांनी सांगितले त्याप्रमाणे मी साक्ष दिली, असे या पीडितेने नमूद केले होते. याचा अर्थ तिला सर्व शिकवले गेले होते. तिची साक्ष विश्वासार्ह नाही, असा दावा आरोपीने केला होता. न्या. अभय वाघवासे यांच्या एकल पीठाने हा दावा फेटाळून लावला.

पोलिसांनी जबाब नोंदवल्यावर जे सांगितलं ते आठवून साक्ष दिली, असे या पीडितेने स्पष्ट केले होते. याचा अर्थ तिला सर्व शिकवले गेले होते असा तर्क लावता येणार नाही. या पीडितेची साक्ष निःसंदेह आहे, असा निर्वाळा देत न्यायालयाने अपील याचिका नामंजूर केली.

जखमा नसल्याचा बचाव अमान्य

पीडितेच्या शरीरावर जखमा नव्हत्या. परिणामी अत्याचार झाल्याचे स्पष्ट होत नाही, असा युक्तिवाद आरोपीने केला होता. हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला नाही. घटनेनंतर पीडिता दोन ते तीन दिवस सतत उलट्या करत होती. ती रात्री झोपेतून उठून रडायची. तेव्हा जखमा नसल्या तरी अत्याचार झाल्याचे नाकारता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.