ज्येष्ठांसाठी ‘ऑन कॉल’ सुविधा, नवी मुंबई महापालिका आयुक्तांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील ज्येष्ठ नागरिकांना गरजेच्या वेळी तत्काळ मदत मिळावी यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ‘ऑन कॉल’ सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या सुविधेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाईल, अशी घोषणा नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली आहे.

मानव विकास ट्रस्ट महाराष्ट्रचा चौथा वर्धापनदिन सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्साहात पार पडला. यावेळी आयुक्त डॉ. कैलास शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मानव विकास ट्रस्टच्या ‘आनंदाश्रम’ प्रकल्पासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘भूमिका’ या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी मानव विकास ट्रस्टच्या वतीने दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे १ लाख ११ हजार १११ रुपये मदतीचा धनादेश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. निराधार महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अनाथांसाठी एकाच परिसरात स्वतंत्र निवास व आधारव्यवस्था निर्माण करण्याचा ‘आनंदाश्रम’ प्रकल्प ट्रस्टच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.

याप्रसंगी सिडकोचे महाव्यवस्थापक वेणुगोपाल नायर, अधिकारी विशाल ढगे, नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड, मराठी साहित्य मंडळाचे सुभाष कुलकर्णी, माजी नगरसेवक विठ्ठल मोरे, सल्लागार अंकुश चव्हाण, नगरसेविका ललिता मढवी, घनश्याम मढवी, संस्थेचे अध्यक्ष विनोद पाटील, ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक आदी उपस्थित होते. विकास महाडिक यांनी संस्थेच्या आनंदाश्रम प्रकल्पाची माहिती उपस्थितांना दिली.