ज्या दोन राजकीय नेत्यांची नावे पुरवणी जबाबात आली, पोलीस त्या दिशेने तपास का करीत नाहीत? आरोपींच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी पुरवणी जबाबात ज्या दोन राजकीय व्यक्तींचा उल्लेख केला आहे त्या दिशेने पोलीस का तपास करीत नाहीत, असा सवाल आरोपींचे वकील अॅड. संग्राम शिंदे यांनी आज ठाणे सत्र न्यायालयात केला. तपासात पोलिसांना अपेक्षित असलेली माहिती फक्त आरोपींकडूनच का मागितली जात आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला.

पूर्णेकर हत्या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी पप्या शिंदे याच्या कोठडीची मुदत आज संपल्याने त्याला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती एस. बी. साबळे यांच्यासमोर पोलीस अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. या प्रकरणात पष्या शिंदे हा पहिला आरोपी असून तो तपासाच्या कामात सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मानपाडा परिसरात २९ सप्टेंबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास पूर्णेकर यांच्यावर त्यांच्या कार्यालयात बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्याने वारही केले. या घटनेच्या वेळी पप्या हा स्वतः उपस्थित होता. त्याने हल्ला होत असताना पूर्णेकर यांना धरून ठेवले होते.

बचाव पक्षाचे वकील अॅड. संग्राम शिंदे यांनी पोलिसांच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, राम पूर्णेकर यांनी पुरवणी जबाबात दोन महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास करायला हवा. त्या दिशेने तपास पोलीस का करत नाहीत, असा सवाल अॅड. संग्राम शिंदे यांनी केला.

बंदूक, हत्यारे सापडली नाहीत

पूर्णेकर यांच्या हत्येच्या कटामागे नेमके कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी पप्या शिंदेची कोठडी वाढवण्याची मागणी न्यायमूर्ती साबळे यांच्याकडे केली. आरोपींनी वापरलेले मोबाईल त्यांच्या स्वतःच्या नावावर नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच वापरलेली हत्यारे अद्याप सापडलेली नसल्याने हत्येचे गूढ कायम आहे.

हॉटेल महाराजचे सीसीटीव्ही ताब्यात

पूर्णेकर यांच्या हत्येचा कट ज्या हॉ टेलमध्ये रचला गेला त्या पोखरण रोड येथील हॉटेल महाराज येथील सीसीटीव्ही फुटेज अखेर ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सीसीटीव्हीमधून काही धागेदोरे सापडतात का? याचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून हत्येतील आरोपी आणि मास्टरमाईंड यांच्या भेटीगाठीचे कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे.

पप्या शिंदेची पोलीस कोठडी ९ ऑक्टोबरपर्यंत वाढवली

पोलिसांच्या पथकाने अलिबागच्या एका डेअरीमध्ये लपलेल्या नीतेश पवार आणि निखिल यादव या आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि हेल्मेटधारी दुचाकीस्वार हल्लेखोर अद्याप फरार आहेत. तसेच हत्येपूर्वी आणि हत्येनंतर आरोपींमध्ये सुमारे १५० वेळा संभाषण झाल्याची माहिती तपासात समोर आली. पप्या शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या कॉल्सचा तपशील, आरोपींच्या हालचाली आणि हत्येच्या नियोजनाचा मागोवा घेण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आज पप्या शिंदेची पोलीस कोठडी ९ ऑक्टोबरपर्यंत वाढवली.

महिला आघाडीने केले पूर्णेकर कुटुंबीयांचे सांत्वन

शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज ठाण्यातील गणेशनगर येथे जाऊन पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी उपनेत्या किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, डॉ. ज्योती ठाकरे, श्रद्धा जाधव, ठाणे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्यासह मुंबईतील सर्व विभाग संघटक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पूर्णेकर कुटुंबीयांना धीर देत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली.

तपास सीबीआयकडे द्या, आगरी-कोळी भूमिपुत्रांनी घेतली ठाणे पोलीस आयुक्तांची भेट

मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, या मागणीसाठी आगरी-कोळी भूमिपुत्रांच्या विविध संघटनांनी आज एकत्र येत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतली. पूर्णेकर यांच्या हत्येमुळे भूमिपुत्रांच्या भावना अत्यंत तीव्र असून या हत्येच्या मुख्य सूत्रधार आणि मारेकऱ्यांचा छडा लावून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही भूमिपुत्रांच्या संघटनांनी केली.